भात उत्पादन क्षेत्र पुन्हा १,६८६ हेक्टरने घटले!

भाजीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ; विधानसभेतील लेखी उत्तरातून स्पष्ट

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी: गेल्या वर्षात राज्यातील भात उत्पादन क्षेत्रात १,६८६ हेक्टरने घट झालीये. तर भाजी लागवड क्षेत्रात मात्र २२७ हेक्टरने वाढ झालीये. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आलीये.

राज्यातील भात उत्पादनात घट

एकेकाळी भात उत्पादनात स्वयंपूर्ण असलेल्या गोव्यात काही वर्षांपासून भाताचं उत्पादन कमी होत चाललंय. विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे गोव्याला तांदळासाठी इतर राज्यांवर अवलंबून रहावं लागतंय. तीन वर्षांत भात उत्पादन क्षेत्र घटतच चाललंय. याउलट भाजीपाला आणि नारळ उत्पादन क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होत असल्याचं कवळेकर यांनी दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झालंय.

२०१९-२० मध्ये ४,६९८ हेक्टर क्षेत्रातच भाताचं उत्पादन

२०१७-१८ मध्ये उत्तर गोव्यातील १६,१३५ आणि दक्षिण गोव्यातील २२,३८५ असे मिळून राज्यातील ३८,५२० हेक्टर क्षेत्रात भात उत्पादन घेण्यात आलेलं. २०१८-१९ मध्ये त्यात २,११८ हेक्टरने घट झाली. यावर्षी उत्तर गोव्यातील १५,५०० आणि दक्षिण गोव्यातील २०,८८४ असे मिळून ३६,३८४ हेक्टरमध्ये भात उत्पादन घेण्यात आलं. २०१८-१९च्या तुलनेत २०१९-२० मध्ये भात उत्पादन क्षेत्रात १,६८६ हेक्टरने घट झाली. २०१९-२० मध्ये उत्तर गोव्यातील १३,८६७ आणि दक्षिण गोव्यातील २०,८३१ असं मिळून ३४,६९८ हेक्टर क्षेत्रातच भाताचं उत्पादन घेतलं गेलं, अशी माहिती मंत्री कवळेकर यांनी उत्तरातून दिलीये.

राज्यातील भाजी उत्पादन क्षेत्रांत वाढ

गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण राज्यातील भाजी उत्पादन क्षेत्रांत वाढ झालीये. पण २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० मधील उत्तर गोव्यातील भाजी उत्पादन १०७ हेक्टरने कमी झालंय. राज्याचा आढावा घेतला असता, २०१७-१८ मध्ये राज्यातील भाजी उत्पादन क्षेत्र ७,५३४ हेक्टर होतं. २०१८-१९ मध्ये त्यात ९१ हेक्टरने वाढ होऊन भाजी उत्पादन क्षेत्र ७,६२५ हेक्टर झालं. तर २०१९-२० मध्ये या क्षेत्रात २२७ हेक्टरने वाढ झाली. २०१९-२० मध्ये राज्यातील ७,८५२ हेक्टर क्षेत्रात भाजी उत्पादन घेण्यात आल्याचंही उत्तरातून स्पष्ट झालंय.

नारळ उत्पादन क्षेत्रात वाढ कायम, पण…!

  • नारळ हा गोमंतकीयांच्या दैनंदिन आहारातील प्रमुख घटक आहे. त्यामुळे गोमंतकीय जनतेने तीन वर्षांपासून नारळ उत्पादनावरील भर कायम असल्याचं मंत्री कवळेकर यांच्या उत्तरातून दिसून येतं. पण, तीन वर्षांचा आढावा घेतल्यास हेक्टरमध्ये घट झाल्याचंही स्पष्ट होतं.
  • २०१७-१८ मध्ये राज्यातील २६,१६९ हेक्टरमध्ये नारळ उत्पादन होतं. २०१८-१९ मध्ये त्यात २१२ हेक्टरने वाढ होऊन या वर्षातील उत्पादन क्षेत्र २६,३८१ हेक्टरपर्यंत पोहोचलं.
  • २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये केवळ १६१ हेक्टरने वाढ होऊन नारळ उत्पादन क्षेत्र २६,५४२ हेक्टर झाल्याचंही मंत्री कवळेकर यांनी उत्तरात म्हटलंय.

भाजी उत्पादनात दक्षिण गोवा अग्रेसर

  • गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतल्यास उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यातील जनतेने भाजी उत्पादनावर अधिक भर दिल्याचं तसंच दक्षिण गोव्यातील क्षेत्रात वाढ झाल्याचं दिसून येतं.
  • उत्तर गोव्यात २०१७-१८ मध्ये भाजी उत्पादन क्षेत्र ३,४५६ होतं. २०१८-१९ मध्ये त्यात ४९ हेक्टरने वाढ होऊन हे क्षेत्र ३,५०५ हेक्टरपर्यंत गेलं. पण, २०१९-२० मध्ये त्यात १०७ हेक्टरने घट होऊन भाजी उत्पादन क्षेत्र ३,३९८ हेक्टरवर आलं.
  • दक्षिण गोव्यात २०१७-१८ मध्ये भाजी उत्पादन क्षेत्र ४,०७८ हेक्टर होतं. २०१८-१९ मध्ये त्यात ४२ हेक्टरने वाढ होऊन हे क्षेत्र ४,१२० हेक्टरपर्यंत गेलं. २०१९-२० मध्ये त्यात तब्बल ३३४ हेक्टरने वाढ झाली. यावर्षी दक्षिण गोव्यातील भाजी उत्पादन क्षेत्र ४,४५४ हेक्टर होतं.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!