मी इथेच आहे, नंतर सविस्तर बोलेन

चिदंबरम् गोव्यात दाखल; माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक तथा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् गोव्यात दाखल झालेत. दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलंय. मी इथेच आहे. नंतर सविस्तर बोलेन, असं चिदंबरम म्हणालेत.

दोन दिवसीय दौऱ्यात चिदंबरम् काँग्रेस आमदार तसंच प्रदेश समित्यांशी चर्चा करून राज्यातील स्थितीचा आढावा घेणार आहेत. चिदंबरम् यांच्या याच दौऱ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, गोवा फॉरवर्डसोबतची युती यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

निवडणुकांची जय्यत तयारी सुरू

राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह, मगो, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी (आप) या पक्षांनीही निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. पण, प्रदेश काँग्रेसची तयारी मात्र स्पष्टपणे दिसत नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने काही मतदारसंघांतील नेते, कार्यकर्त्यांनीही पक्ष कार्यापासून पाठ फिरवली. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसला पुन्हा उर्जीतावस्था मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसने काहीच दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांची गोव्याचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करत निवडणुकीची रणनीती तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

हेही वाचाः आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

दोन दिवसीय दौऱ्यात काँग्रेसचे पाचही​ आमदार, ज्येष्ठ नेते, प्रदेश काँग्रेसच्या समित्यांशी बैठका

या दोन दिवसीय दौऱ्यात पी. चिदंबरम् काँग्रेसचे पाचही​ आमदार, ज्येष्ठ नेते, तसेच प्रदेश काँग्रेसच्या समित्यांशी बैठका घेणार आहेत. गोव्यातील सद्यस्थिती आणि काँग्रेसच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतल्यानंतर चिदंबरम् प्रदेशाध्यक्ष बदल आणि युतीसंदर्भातही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली.

हेही वाचाः अखेर दिलासा, जामीन मंजूर! राणेंची रात्र जेलमध्ये जाणार नाही तर…

चिदंबरम् यांना लोबो, विजय भेटण्याची शक्यता

भाजपवर कमालीचे नाराज असलेले मंत्री तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यासह काँग्रेस प्रवेशाची शक्यता असलेले जयेश साळगावकर, रोहन खंवटे, प्रसाद गावकर हे नेते चिदंबरम् यांची भेट घेण्याची शक्यता आहे. याशिवाय गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाईही युतीबाबत चिदंबरम् यांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रभारींकडून मतदारसंघांचे दौरे

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सोमवारपासून राज्यभरात बैठकांचा धडाका लावला आहे. विविध मतदारसंघांतील काँग्रेसच्या गट समित्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बैठका घेऊन ते तळागाळातील कार्यकर्त्यांत पुन्हा आत्मविश्वास आणण्याचा आणि २०१७ नंतर पक्षापासून दूर गेलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षाकडे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राव यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही बैठकांचे सत्र सुरू केलं आहे. या बैठकांमुळे गट समित्यांचे पदाधिकारी एकत्र येत असल्याचंही दिसून येत आहे.

हा व्हिडिओ पहाः MINING | अंबानी-अदानींना खाणी आंदण देण्याचा डाव!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!