ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्ससह वायूसेनेची दोन विमाने गोव्यात दाखल

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाविरुद्धच्या लढाईत गोव्याला मदत करण्यासाठी रक्षा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पुढाकाराने भारतीय वायू सेनेची दोन विमाने आज ऑक्सिजन कन्सॅनट्रेटर्स व अन्य वैद्यकीय साहित्यासह गोव्यात दाखल झाली.
गोव्यातील वाढते कोरोना बाधित आणि दिवसेंदिवस वैद्यकीय यंत्रणेवरील वाढता ताण या गोष्टींचे गांभिर्य लक्षात घेऊन गोवा सरकारने काल सायंकाळी राज्य मंत्री श्री. नाईक यांची मदत मागितली. श्री. नाईक यांनी त्यादृष्टीने लागलीच पावले उचलली आणि आज वायूसेनेची दोन विमाने ३२३ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर व अन्य वैद्यकीय उपकरणांसह गोव्यात पोहोचली.
यासंदर्भात केंद्रीय मंत्री श्री. नाईक म्हणाले, “गोव्यासह सर्व राज्यांत महामारीचे मोठे संकट आले आहे. ऑक्सिजनची टंचाई सरकारची डोकेदुखी झाली आहे. दिवसें दिवस ऑक्सिजनची गरज वाढत आहे. राज्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे.”
“भारतीय सेनेने कोरोना विरुद्धच्या लढ्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले असून त्यांचे मदत कार्य जोरात सुरू आहे. दोस्त राष्ट्रांनी पुरवलेल्या ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सामुग्री भारतात आणण्यात नौदल मोलाची कामगिरी बजावत आहे, तर वायूसेना मदत करण्यासाठी एका पायावर तयार आहे,”
“गोव्यात लवकरात लवकर ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत राज्य सरकारने वेळीच आपल्याला त्यांची गरज कळवावी. ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू,” असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. श्रीपाद नाईक यांनी सर्व सहकार्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!