परप्रांतियांना सदस्यत्व देणार नाही : परब

रिव्हॉल्युशनरी गोवन्सकडून राजकीय पक्षाची घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : रिव्हॉल्युशनरी गोवन्स संघटनेने राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जमिनी, उद्योग, व्यवसाय बळकावणाऱ्या स्थलांरितांविरोधात लढा देताना गोवेकरांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी हा पक्ष काम करणार असल्याचं रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब म्हणालेत.

चाळीसही मतदारसंघातून लढवणार निवडणूक

रिव्हॉल्युशनरी गोवन्सतर्फे स्थापन करण्यात येणारा हा नवा पक्ष येत्या विधानसभा निवडणूकीत उभा राहणार आहे. या पक्षामार्फत येती विधानसभा निवडणूक चाळीसही मतदारसंघातून लढवली जाणार असल्याची घोषणा संघटनेचे प्रमुख मनोज परब यांनी केली आहे. पणजीत सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत परब बोलत होते.

हेही वाचाः RG | मनोज परब यांना पुन्हा दिलासा…

‘पक्षाचे सदस्य व्हा’

गोवेकरांचं हीत जपण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. म्हणूनच पक्षाची स्थापना करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या ३-४ महिन्यांत पक्षाची अधिकृत नोंदणी होईल. ८८०१००००११ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन पक्षाचं सदस्य व्हावं, असं आवाहन परब यांनी केलं. हा पक्ष पालिका, जिल्हा पंचायती अथवा नावेली पोटनिवडणूक लढणार नाही. थेट २०२२ सालची विधानसभा निवडणूक लढणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचाः ‘सर्व 40 जागा लढवणार! मनोज परब यांचा विधानसभा लढवण्याचा निर्धार

परप्रांतीय, स्थलांतरितांना पक्षाचं सदस्यत्व नाही

गावागावांत संघटनेचे कार्यकर्ते आहेत. सभा, बैठकांची तयारी हेच कार्यकर्ते करत असतात. हे कार्यकर्ते पक्ष उभारणीसाठी निधी संकलनही करतील. माफिया किंवा मोठ्या उद्योजकांकडून रिव्हॉल्युशनरी गोवन देणगी घेणार नाही. सामान्य जनतेकडूनच निधी घेतला जाईल. ज्यांना पक्षाचे सदस्य व्हायचं असेल, त्यांनी वरील क्रमांकावर मिस कॉल द्यावा. त्यानंतर संघटनेचे कार्यकर्ते मिस्ड कॉल करणाऱ्यास संपर्क साधून पुढील प्रक्रिया करतील, असंही परब यांनी यावेळी सांगितलं. परप्रांतीय किंवा स्थलांतरितांना पक्षाचं सदस्यत्व दिलं जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचाः गृहनिर्माण मंडळाच्या नियमांवर `पोगो`ची छाप

गोव्यात बदल घडवण्यासाठी पक्षाची स्थापना

परप्रांतियांनी गोव्यातील जमिनी बळकावल्या. बेकायदेशीर घरे बांधली. आता ही घरे कायदेशीर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सामान्य गोवेकराला घर खरेदी करणं अवाक्याबाहेरचं झालं आहे. मात्र, परप्रांतियांना ती सहज मिळत आहेत. त्यांची नावंही येथील मतदारयाद्यांत आहेत. हे सगळं बदलण्यासाठी रिव्हॉल्युशनरी गोवन्सला पक्ष स्थापन करावा लागत आहे, असं मनोज परब यांनी म्हटलंय.

आणखी एक पक्ष सत्तरीत

सत्तरी युवा मोर्चानंतर आता सत्तरी तालुक्यातून आणखी एका राजकीय पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे झालीये. गोवा राष्ट्रवादी पक्ष या नावाने नोंदणी झालेल्या या पक्षाचा पत्ता चिंचमळ वाडा-पर्ये, सत्तरी असा आहे. काही वर्षांपूर्वी ‘सत्तरी युवा मोर्चा’ नावाने एका राजकीय पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे झालेली आहे. त्या पक्षाचा पत्ता कणकिरे-गुळेली, सत्तरी असा आहे. २०२२ मधील विधानसभा निवडणूक जवळ येत असल्यामुळे प्रसंगी आपला स्वतंत्र राजकीय पक्ष असावा, या हेतूने सध्या काही राजकीय पक्षांची नोंदणी प्रक्रियाही सुरू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!