प्रेरणादायी! शिवणकामातून नाव कमावणाऱ्या मांद्रेतील संजय सातोस्करांची यशोगाथा

प्रत्येकानं पाहावी आणि वाचावी अशी सक्सेसवार्ता

मकबूल माळगीमनी | प्रतिनिधी

सुई धागा

समारंभ म्हटले की पुरुषापेक्षा महिला विषयी लोकांना अधिक कुतूहल असते. सणांच्या दिवशी तिने केलेला साजशृंगार, साडी, मेकअप, केशरचना, मेहंदी यांचे वेगळेच आकर्षण असते. त्यामुळेच हेअर ड्रेसर,मेकअपमन, फॅशन डिझायनर, ज्वेलरी डिझायनर यांना वाढती मागणी दिसते. काळानुरूप आणि बदलत्या जीवनशैलीमुळे असेल; परंतु आजच्या अनेक मुलींना पारंपारिक कलांचा विसर पडत चालला आहे. शिवणकाम, विणकाम, भरतकाम यात सगळ्याच मुलींना रस असतो असे नाही. शिवाय आजच्या करिअरच्या धावपळीच्या जगात तेवढी उसंतही नसते. त्यामुळे ही कला नवव्या मुलीच्या हातून निसटत आहे आणि त्यामुळेच संधी आहे ती या क्षेत्रात उतरू पाहणाऱ्या व्यावसायिकांना.

जशी मागणी तसा पुरवठा

मांद्रे येथील संजय सातोस्कर हे एक उत्तम उदाहरण. त्यांनी त्याला व्यवसायाचे रूप दिले आहे. बेकारीचे सावट पसरत असल्याने आपल्या या अंगभूत कलेला त्यांनी व्यवसायात रूपांतरीत केले. त्यांना लहानपणापासून आवड होती, वयाच्या पंचविशीपासून ते हा व्यवसाय करीत आहेत. तोरण, क्रॉस स्टीच, लोकरीचे टॉवेल, नऊवारी, लुगडे, धोती, टेबलक्लॉथ, बेडशीट, उशांचे अभ्रे करण्यात ते माहीर आहेत. त्या व्यतिरिक्त स्त्रियांच्या आवडी निवडीनुरूप ते साड्यांवर स्वत: हँन्ड अ‍ॅब्रॉयडरी, पॅचवर्कसुद्धा करतात. मुलींना आपल्या आईकडून वारसाने मिळणारी शिवणकाम-भरतकामाची ही कला देवाचीच कृपा आहे.

परमेश्वराची देण

ही कला परमेश्वराने माझ्या हाती टाकली, त्याचा मी ऋणी आहे, असे सातोस्कर सांगतात. कुठल्याही प्रकारची कार्यशाळा वा अभ्यासक्रम न करता त्यांनी ही कला आत्मसात केली आणि तिला व्यवसायाचे रूप दिले. सातोस्कर यांना कोणत्याही प्रकारचे विणकाम वा भरतकाम करायला किमान दोन तास व जास्तीत जास्त दोन दिवस लागतात. या व्यवसायात संयम आणि आवड या दोन गोष्टी आवश्यक आहेत, असे ते सांगतात. वधूच्या आवडीनुरूप केलेल्या शिवणकामाला किमान दहा हजार व कमाल एक लाख ऐशी हजार रुपये खर्च येतो.

सर्वधर्मसमभाव

कोणत्याही प्रकारची सरकारी आर्थिक मदत न घेता हा व्यवसाय चालवण्याची हिंमत सातोस्कर यांनी दाखवलेली आहे. हिंदू वधूच त्यांच्याकडे येतात असे नाही, तर ख्रिश्चन वधूही आपल्या लग्नासाठी लागणाºया वस्तू हौसेने त्यांच्याकडून करून नेतात. मुलींना आपल्या आईकडून मिळणारी ही कला कोठेतरी हरवत चालली आहे. ही कला जोपासण्याची आणि त्याला व्यवसायाचे सफल रूप देण्याची संजय सातोस्कर यांची जिद्द नक्कीच कौतुकास्पद आहे.

संजय सातोस्कर प्रमाणे त्यांची पत्नी संपदा सातोस्कर ही या कामात मदत करतात. संजय सातोस्करकडे गोव्यातील तसेच महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातील लोक लग्न कार्याच्या वस्तूसाठी येतात. ते म्हणतात नोकरीच्या मागे न लागता आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय करणे योग्य ठरले. सरकारी नोकरी सर्वांना मिळते असे नाही. आपल्या अंगी असलेल्या कला जगाला दाखवून द्यायला हवे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!