सावईवेरेचा आदर्शपाठ! अंत्यदर्शन घेतलं, खांदाही दिला… आणि SOPसुद्धा पाळली

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : करोना काळात लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. एखाद्या करोना बाधिताचा मृत्यू झाला तर संसर्गाच्या भितीने लोकं दूर पळतात. मृत व्यक्तीवर कुटुंबीयांना रितसर अंत्यसंस्कारही करता येत नाहीत. संसर्गाच्या भितीमुळे आणि आणि मार्गदर्शक तत्वांमुळे आपल्यातून गेलेल्या व्यक्तीला निरोपही देता येत नाही. अंत्यदर्शन तर दूरच पण मृतदेहाला खांदाही दिला जात नाही. अशा या कठीण परिस्थितीत संवेदनशीलतेचे दर्शन घडलंय सावईवेरे या गावात. सावईवेरेतील ग्रामस्थांनी अंत्यविधी आणि एसओपी मधून सुवर्णमध्य साधलाय. या गावातील लोकांनी करोना बाधित मृत व्यक्तीचं अंत्यदर्शनंही घेतलं, त्यांना खांदाही दिला आणि SOPसुद्धा पाळली.
राज्यात कोविडमुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या आता पाचशेच्या पार गेली आहे. सुरुवातीचे दोन मृतदेह सोडले, तर बाकीचे सगळे मृतदेह नातेवाईकांनी स्वीकारलेत. ख्रिस्ती आणि मुस्लीम आपल्या पद्धतीने अंत्यसंस्कार करतायत. हिंदूंमध्ये मात्र अजूनही याबाबत संभ्रव आहे. परिणामी कुटुंबातील एक दोन सदस्य सोडल्यास कुणीही अंत्यदर्शनही घेत नाही. याला अपवाद ठरलं ते सावईवेरे गाव.
शुक्रवारी कूळ आणि मंडगार कायद्याप्रकरणात अनेक प्रकरणे धसास लावणारे प्रसिद्ध वकील अँड. सत्यवान पालकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळच्या मोकळ्या जागेत आणून ठेवण्यात आला. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या ग्रामस्थांनी यावेळी अंतिम दर्शन घेतलं. इतकंच नव्हे तर त्यांच्या मृतदेहाला खांदाही दिला.
अॅडवोकेट पालकर हे कोरोनो पॉझिटिव झाल्याने गोमेकोत दाखल झाले होते. पण मूत्रपिंडाच्या आजारमुळे त्यांची कोविडशी झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या माजी सरपंच्याच्या निधनाचं वृत्त गावात पोहोताच ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी त्यांच्या घरी धाव घेतली. तसंच आपल्या लोकप्रिय वाकिलाचं पार्थिव गावात आणण्याची विनंती कुटुंबीयांना केली.
एसओपी- रिती सुवर्णमध्य
तशेच मार्गदर्शक तत्वानुसार कोणते विधी करता येतात याची माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या ग्रामस्थांनी मिळवली. मृतदेह घरात न नेता खुल्या जागेत दर्शनासाठी ठेवला. ग्रामस्थांनीही परिस्थितीचं भान ठेवत कमीत कमी वेळेत अंत्यदर्शन घेतलं. पीपीई घालण्यापासून सर्व काही शिकून घेतले आणि रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार पार पाडले.
हेही वाचा –
खाजगी हॉस्पिटलमधील कोविड उपचारांसाठी ‘दीनदयाळ’ रद्द
आयआयटी आंदोलनाला जमीन मालकी हक्काचे व्यापक स्वरूप