कचऱ्याचे फोटो ‘या’ नंबरवर पाठवा, लगेच चकाचक केलं जाणार

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी
मडगाव : पालिकेतील कारभारात सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास तीन दिवसांत किंवा तत्काळही जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कचरा समस्येसाठीही नागरिकांनी व्हॉटसअपवर संदेश पाठवल्यास त्याची तत्काळ दखल घेण्यात येईल, असे वचन मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी दिलंय.
मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटण्यासाठी पालिकेच्या कारभारात बदल करण्यास सुरुवात केली आहे. गेले काही महिने प्रलंबित असलेल्या कामांच्या फाईल्स, बिलांच्या फाईल्स हातावेगळ्या केल्या जात आहेत.
आता मिळणार चांगली सेवा
लोकांना चांगली सेवा मिळण्यासाठी किंवा त्यांना वाईट वागणूक मिळत असल्यासही त्यांनी आपणाशी संपर्क साधल्यास त्या कर्मचाऱ्याला समज दिली जाईल, असेही फर्नांडिस यांनी म्हटले आहे. पालिका ही नागरिकांच्या सेवेसाठी आहे. जागरुक नागरिकांनी केलेल्या सूचनांचा आदर केला जाईल. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांची कामंही वेळेत होण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्यात. यापुढे नागरिक हाच केंद्रबिंदू मानून पालिकेचे कामकाज पुढे नेण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी सांगितले.
नागरिकांची पालिकेतील कामे प्रलंबित असल्यास ते वैयक्तिकरित्या भेटू शकतात किंवा 7030910926 या व्हॉटसअप क्रमांकावर संदेश पाठवू शकतात, असेही मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी म्हटलंय.