IITच्या आंदोलनाला अधिक बळ, पंचायतीचा NOC देण्यास नकार

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी: सत्तरीतील शेळ मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाविरुध्द सुरू असलेल्या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. आयआयटी प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीला स्थानिक गुळेली पंचायतीनं ना हरकत दाखला देण्यास नकार दिला. मंगळवारी झालेल्या खास बैठकीत पंचायत मंडळाने हा निर्णय घेतला.
गुळेली पंचायत क्षेत्रातील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांचो विरोध आहे. स्थानिकांचे मागील कित्येक दिवसांपासून आयआयटी विरोधात आंदोलन सुरू आहे. गोव्यातील इतर भागातून तसेच सामाजिक संस्था आणि विरोधी राजकीय पक्षांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे.
यांनी काढली होती संरक्षक भिंतीची निविदा
गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ मेळावली येथे महसूल खात्याच्या जागेत प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. 10 लाख स्क्वेर मीटर जागेत या प्रकल्पाची उभारणी होणार आहे. या प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीची निविदा (टेंडर) पीडब्ल्यूडी खात्याच्या फोंडा विभागाने काढली होती. पीडब्ल्यूडी खात्याने ही निविदा त्वरित मागे घ्यावी, असे लेखी निवेदन ग्रामस्थांनी फोंडा पीडब्ल्यूडी कार्यालयाला केले होते.
आंदोलक महिलांचे पंचायतीसमोर मूक धरणे
स्थानिक पंचायतीने या संरक्षक भिंतीला ना हरकत दाखला दिला आहे का? अशी विचारणा करताना, पंचायतीने संरक्षक भिंतीला ना हरकत दाखला देऊ नये, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली होती. मंगळवारी गुळेली पंचायत मंडळाची याविषयीची खास बैठक संपन्न झाली. या बैठकीत सगळ्या पंच सदस्यांनी यावर चर्चा केली. शेवटी सर्वांनी संरक्षक भिंतीला ना हरकत दाखला न देण्याबाबत निर्णय घेतला. सकाळपासून शेळ मेळावलीच्या महिला पंचायतीसमोर मूक आंदोलनाला बसल्या होत्या.
कितीही दबाव आणा, आंदोलन सुरूच रहाणार
प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाविरोधात स्थानिकांचे आंदोलन चालूच आहे. काहीही झाले तरी शेळ मेळावलीत आयआयटी होऊ न देण्यावर स्थानिक ठाम आहेत. काही दिवसांपूर्वी आयआयटीची जमीन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना लोकांनी आत जाऊ दिले नव्हते. सरकारी कामात व्यत्यय आणल्याच्या आरोपाखाली वाळपई पोलिसांनी दोन आंदोलकांनी अटकही केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. कितीही दबाव आणला तरी मागे हटण्याचा निर्धार स्थानिकांनी केलाय. आता नोटिसा काढून गावातील एक एकट्याला पोलीस स्टेशनवर बोलविण्याचे सत्र सुरू आहे. एक एकट्याला न बोलवता गावातील सर्वांना अटक करा, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.