होंडा शिक्षकांचा तब्बल 5 महिन्यांचा पगार रखडला

Goan Varta Live | प्रतिनिधी
होंडा : होंडा सत्तरी येथील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांचा आणि कर्मचार्यांचा पाच महिन्यांचा पगार रखडला आहे. त्यामुळे शिक्षक, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सध्या या विद्यालयाच्या नवीन समितीची निर्मिती शशिकला कृष्णराव राणे सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे. या समितीला शिक्षण खात्याने मान्यता देण्याची प्रक्रिया ३ ऑगस्टपासून सुरू आहे.हाती आलेल्या माहितीनुसार ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच शिक्षकांना आणि कर्मचार्यांना पगार मिळणार आहे. या समितीला मान्यता केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिक्षकांच्या आणि कर्मचार्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रखडलेला पगार शिक्षक आणि कर्मचार्यांना तात्काळ मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. आधीच कोरोनामुळे सर्व गोष्टी महागल्या आहेत. अशात पगार नसल्यानं घर कसं चालवायचं या प्रश्नानं शिक्षक हवालदिल झालेत. वेळेत थकीत पगार मिळाला नाही, तर या सर्व शिक्षकांचं जगणं मुश्किल होणार आहे. गेल्या 5 महिन्यांपासून कसंबसं या शिक्षकांना घर चालवावं लागतंय. पाच महिने उलटून गेल्यानंतरही पगार न झाल्यानं शिक्षक आणि कर्मचारी वर्गामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.