राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना लवकरच सुरुवात

कोवीड 19 महामारीमुळे राज्यातील कलाकारांमध्येही मोठ्या प्रमाणांत मरगळ आली आहे. ही मरगळ दूर करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंत्री गोविंद गावडेंनी सांगितले.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी- कोरोना महामारीमुळे सर्वच गोष्टी मागील कित्येक महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत. याला सांस्कृतिक क्षेत्रही अपवाद नसल्याचे कला आणी सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडेंनी सांगितले. डिसेंबर महिन्यापासून राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देणार असल्याची माहिती मंत्री गावडेंनी दिली.

कलाकारांमधली मरगळ दूर करणे गरजेचे
डिसेंबर महिन्यापासून राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याविषयी मुख्यमंत्र्याना प्रस्ताव धाडला आहे. या बाबत मी सकारात्मक असल्याचे गावडेंनी सांगितले. अर्ध्या क्षमतेने 15 ऑक्टबरपासून थिएटर उघडणार आहेत, तर आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम सर्व खबरदारी घेऊन सुरू करण्यास हरकत नसल्याचे मत गावडेंनी मांडले. कलाकारांमध्येही निराशेचं वातावरण पसरलं आहे ते दूर करण्याची अत्यंत गरज असल्याचे गावडेंनी सांगितले.

डिसेंबरमध्ये फुगडी स्पर्धेचे आयोजन
फोंड्याच्या राजीव गांधी कलामंदिरात दरवर्षी राज्य पातळीवरील फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेचा राज्यभरात नावलौकिक आहे. लवकरच राजीव गांधी कलामंदिराच्या व्यवस्थापन मंडळाची या संदर्भात महत्वाची बैठक होणार असल्याचे मंत्री गावडेंनी सांगितले. ही फुगडी स्पर्धा महिलांच्या कलेला वाव देण्याच्या उद्देशाने महत्वाची आहे. मर्यादित प्रेक्षकवर्गाच्या माध्यमातून या फुगडी स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची माहिती मंत्री गोविंद गावडेंनी दिली.

गोव्याचा ब्रॅंड ‘लोकोत्सव’ होणारच
कला अकादमीच्या दर्यासंगमावर दरवर्षी लोकोत्सव भरवला जातो. लोकोत्सवात देशभरातील लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती, कलाकुसर यांचं प्रदर्शन भरवलं जातं. 10 दिवसांच्या या लोकोत्सवाला लाखो लोक भेट देतात. या विषयी मंत्री गावडे म्हणाले, लोकोत्सव हा गोव्याचा ब्रॅण्ड झालाय. या वर्षीही लोकोत्सवाचे आयोजन कला आणि संस्कृती खाते करणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. जानेवारीत लोकोत्सवाचं आयोजन करणं शक्य नसल्यास एप्रिलमध्ये आयोजन करण्यात येईल अशी माहिती गावडेंनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!