फातर्प्यात लवकरच कृषी मेळावा!

अजय लाड | प्रतिनिधी
केपे : शेतकी खात्याच्या विविध उपक्रमांमुळे यंदा भाजीपाल्याची लागवड जास्त झाली आहे. तसेच फातर्पा भागात लागलीच एक कृषी मेळावा घेण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर (Babu Kavlekar) यांनी केली.
फातर्पा पंचायत क्षेत्रातील नागरिकांना कवाथे, पेरू, आंबा,लिंबू व विविध प्रकारच्या झाडाच्या कलमांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच मंदा नाईक देसाई, उपसरपंच बापतीस फर्नांडिस, पंच संजील डिकॉस्टा, मेदीनी नाईक, शीतल नाईक, नीतल फळदेसाई, मिलाग्रीन फर्नांडिस, केपे विभागीय कृषी खात्याचे अधिकारी संदेश राऊत देसाई, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विराज देसाई व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
रोपांचे दुप्पट वाटप
कृषी मंत्र्यांनी यावर्षी विशेष प्रयत्न करून होमस्टेड गार्डन या योजनेअंतर्गत सर्व मतदारसंघामध्ये 1 हजार रोपांच्या जागी 2 हजार रोपांचे वाटप केले आहे. अशी दुप्पट फळझाडांची रोपे वाटणारे बाबू कवळेकर हे पहिलेच कृषी मंत्री आहेत.
कवळेकर यांनी सर्व शेतकर्यांना किसान क्रेडिट कार्डचे विना हमी 1.6 लाख रुपये जे मिळतात त्याचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. नुसती विना हमी नसून विना व्याज अशी ही रक्कम असते जी, एका वर्षात परत भरून तेच कर्ज दुसर्या वर्षी परत मिळवता येते असे कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्याच बरोबर कृषी खात्याच्या नवीन भाजीपाला लागवडीसाठी छोटे छोटे शेतकर्यांचे गट निर्माण करून या गटांना 80 हजार रुपये खर्च म्हणून दिला जातो, यासाठीही शेतकर्यांनी पुढे यावे असेही आवाहन त्यांनी केले. या भागात जो मैदानाचा मोठा प्रश्न आहे तो येत्या काळात सुटणार आहे. श्री महामाया देवस्थानशी तशी बोलणीही चालू आहेत. तसेच पावसाळ्यानंतर 5.5 कोटी खर्चून सर्व रस्त्यांची डागडुजी केली जाणार असल्याचेही कवळेकर म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराज देसाई यांनी केले. पंच संजय डिकॉस्ता यांनी आभार मानले.