दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांचं पथक श्रीपाद नाईकांसाठी गोव्यात

श्रीपाद नाईक यांची प्रकृती सध्या स्थिर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : सोमवारी झालेल्या अपघातानंतर तातडीनं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे गोव्यात आले. जीएमसीतील डॉक्टरांसोबत त्यांनी चर्चा केली. गरज वाटली तर श्रीपाद नाईक यांनी दिल्लीला उपचारासाठी नेऊ, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. तर दुसरीकडे एक महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांचं पथक श्रीपाद नाईकांसाठी गोव्यात दाखल होतंय. हे पथक श्रीपाद नाईकांच्या प्रकृतीचा आढावा घेणार आहे. सोमवारी रात्री उशिरा तब्बल चार तास श्रीपाद नाईक यांच्यावर चार महत्त्वाच्या शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही कळतंय.

अंकोलात अपघात झाल्यानंतर श्रीपाद नाईक यांना तातडीनं गोव्यात आणण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्यावर जीएमसीतील डॉक्टरांनी उपचार सुरु केले. अजूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना दिल्लीला नेण्याची गरज नसल्याचं सांगितलं जात होतं. अशातच आता दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक गोव्यात येतंय.

मोदींकडूनही विशेष लक्ष

राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा श्रीपाद नाईकांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचं म्हटलंय. मोदींच्या सुचनेप्रमाणेच राजनाथ सिंह गोव्यात दाखल होऊन त्यांनी तातडीनं सर्व वैद्यकीय मदतीचा आढावा घेतला होता.

चालकावर गुन्हा

महत्त्वाचं म्हणजे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचे ड्रायव्हर सुरज नाईक यांच्याविरुद्ध अंकोला पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम २७९, ३०४ अ, ३३७ आणि ३३८ खाली गुन्हा नोंद केला आहे. सोमवारी गोकर्णनजिकच्या हिल्लूर- होसकांबी येथे हा भीषण अपघात झाला होता. या अपघातात श्रीपाद नाईकांसह चालक बचावला होता. तर श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!