प्रशासन तुमच्या दारी! उपमुख्यमंत्र्यांचा रखडलेली कामं सोडवण्यासाठी एक्शन प्लान

Goan Varta Live | प्रतिनिधी
केपे : उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी आपल्या मतदार संघ केपेत लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवण्यासाठी स्तुत्य उपक्रम सुरु केलाय. प्रशासन तुमच्या दारी असं या उपक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमात दर गुरुवारी उपमुख्यमंत्री सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्येक वाड्यावर जातात. सध्या हा कार्यक्रम केपे नगरपालिका विभागांमध्ये चालू आहे.
संवादातून समस्येचं सोल्यूशन
प्रभाग क्र १, २ आणि ३ मध्ये आत्तापर्यंत हा कार्यक्रम झालाय. तसेच फातर्पा पंचायतीतही असा कार्यक्रम झाला आहे. आत्तापर्यंत दर गुरुवारी उपमुख्यमंत्री केपेत नगरपालिका सभागृहात जनता दरबार लावायचे. यातून जनतेच्या समस्या ऐकायचे. पण कोरोनाच्या संसर्गानंतर आणि योजनात दरबारात होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासन आपल्या दारी ही नामी शक्कल त्यांनी लढविली.
प्रशासकीय यंत्रणेमध्ये सा. बां. खात्याचे अधिकारी, पाणी पुरवठा, वीज, कृषी, नगर नियोजन, नगरपालिका प्रशासन, गरज भासल्यास आरोग्य खात्याच्याही लोकांना पाचारण केलं जाते. या कार्यक्रमात लोक विविध विषय मांडतात. स्थानिक रस्त्याचे प्रश्न असो किंवा मग पिण्याच्या पाण्याचे…जगण्याशी संबंधित प्रत्येक विषय लोकं मांडतात. विशेष म्हणजे इथे पूर्णपणे खुली चर्चा होते. अधिकारी पुढच्या कारवाईची योजना मांडतात ज्याची नोंद होते आणि विषय पुढे जातो. काही ठिकाणी मग उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांना कानपिचक्याही देताना दिसले. बराच काळ रखडलेली कामे ह्या कार्यक्रमात सुटताना दिसतात.
उपमुख्यमंत्री म्हणतात,…
जनतेचे प्रश्न मध्यंतरी कसे सोडवावे असा एक पेच माझ्या समोर होता. कोविड मुळे गर्दी टाळावी आणि सगळे अधिकारी समोरा समोर असल्याशिवाय कामे होत नाहीत,म्हणून ते म्हणाले कि प्रशासनालाच लोकांपर्यंत घेऊन जायचे ठरवलं.
चंद्रकांत बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री
केपे नगरपालिका वॉर्ड क्रमांक तीनमधील सना बी म्हणतात…
उपमुख्यमंत्र्यांच्या हा उपक्रम खूपच चांगलाय.आत्ता पर्यंत घरी पाण्याची समस्या होती. कारण त्याभागात येणारी पाईपलाईन छोटी होती. आज इथे समस्या मांडल्यानंतर तातडीनं अधिकाऱ्यांनी येऊन जोड तपासणी करण्याचे आश्वासन दिलं. इतकंच काय तर नळजोडणी न झाल्यास उपमुख्यमंत्र्यांनी पुढच्या गुरुवारी आपल्याला सांगा, असं सांगितले. आणखीन एक रहिवास्याने भागात पावसाचे पाणी तुंबत असल्याची तक्रार केली,लागलीच उपमुख्यमंत्र्यांनी अभियंत्याला ते दुरुस्त करण्याचे आदेश दिले आणि त्याचा रिपोर्ट एका महिन्यात देण्यास सांगितलाय.
इतरही आदर्श घेणार का?
उपमुख्यमंत्र्यांनी सुरु केलेला स्तुत्य उपक्रम राज्यातील इतर मंत्र्यांसाठीही एक आदर्श असल्याची लोकांची भावना आहे. याचप्रकारे आठवड्यातील एक दिवस इतरही मंत्री आपआपल्या भागात अशाप्रकारे जनता दरबार भरवतात का, याकडे राज्यातील लोकांचं लक्ष लागलंय.