सख्याहरीचा जयघोष यंदा रद्द

सावईवेरे अनंत देवाचा कालोत्सव मर्यादित स्वरूपात

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा: सावईवेरे गावात विविध सांस्कृतीक तसेच धार्मिक उपक्रम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येतात. सख्याहरी जत्रा हा वार्षिक कार्यक्रम जवळपास आठवडाभर साजरा केला जातो. कोरोना महामारीमुळे मात्र बरेच उत्सव यंदा मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येणारे.

सावईवेरे भागात उत्सवांची कमतरता नाही मात्र अनंतचा कालोत्सव व त्यात होणाऱ्या सख्याहरीची मात्र आतुरतेने वाट पहिली जाते. मात्र यंदा कोरोनमुळे कालोत्सव मर्यादित स्वरूपात होणारे. सावईवेरेतील श्री लक्ष्मीनारायण मंदिराजवळच्या मुख्य रस्त्यावर आकर्षक असं तोरण बांधलं जातं.पोफळीच्या झाडाच्या विविध घटकांचा वापर करून हे तोरण बांधलं जातं.ही वेगळी कला अनेक वर्षांपासून शिलवाडा येथील युवकांनी विकसित केलीये. सात दिवस हा उत्सव चालत असला तरी कालोत्सव पहिल्याच दिवशी होतो. कालोत्सवाशिवाय अन्य सहा दिवस निरनिराळ्या वाहनातून श्रींची फेरी काढली जाते. चक्क सातही दिवस मंदिरात भाविकांची लगबग पाहायला मिळते. येथील प्रत्येक उत्सवाचं स्वरूप व वैशिष्ठ्य वेगळं असतं.

श्री अनंत देव

कुळागारे व निसर्गाने नटलेल्या रम्य अशा सावईवेरे गावातील प्रसिद्ध अशा श्री अनंत देवस्थानच्या जत्रोत्सवाला (कालोत्सव) वेगळं वैशिष्ठ्य आहे. या मंदिरचा जत्रोत्सव दरवर्षी डिसेंबर महिन्यात साजरा केला जातो. यंदा १७ ते २३ डिसेंबर या कालावधीत हा उत्सव साजरा होणारे. जत्रोत्सवाचा प्रारंभ कालोत्सवानं होत असल्यानं त्याच दिवशी सुप्रसिद्ध ‘सख्याहरी’ मिरवणूक काढली जाते. या सख्याहरीचा प्रसार व प्रचार गोव्यात झाला असून गोव्याच्या कानाकोपऱ्यातून सख्याहरी पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थिती लावतात.

  • कोरोनमुळे यंदा सख्याहरी रद्द

अनंताचा कालोत्सव मर्यादित स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समितीनं घेतलाय. त्यानुसार गुरुवार १७ रोजी श्रींची पालखी मिरवणूक अनंत देवस्थानकडून श्री सातेरी मंदिर सावईवेरे, श्री शांतादुर्गा मंदिर सातेरीभाट व श्री लक्ष्मीनारायण मंदिर सावई याठिकाणी प्रस्थान करणारे. यंदा सख्याहरी खंडित ठेवण्यात आला असून वाटेत भाविकांकडून ओवाळणी व भेटीदाखल इतर साहित्य स्वीकारले जाणार नाही. श्रीची पालखी देवस्थानमध्ये परतल्यानंतर कालोत्सव व इतर धार्मिक विधी मर्यादित स्वरुपात होतील. उत्सव काळातील गावातील सजावटीचे आकर्षण असलेल्या कमानी व तोरणही मर्यादित स्वरुपात उभारले जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलंय. शुक्रवार १८ रोजी नौकाविहार, शनिवार १९ रोजी गरुडासन, रविवार २० रोजी विजयरथ, सोमवार २१ रोजी सिंहासन, मंगळवार २२ रोजी हत्ती अंबारी, बुधवार २३ रोजी शेषासन हे सर्व उत्सवही मर्यादित स्वरुपात होणारे. गुरुवार २४ रोजी दशमीला उत्सवाची सांगता होईल.यंदा सुरक्षित राहून उत्सवाचा आनंद लुटुया आणि “सख्याहरी माझ्या पांडुरंगा” असं नामस्मरण पुढील वर्षासाठी जपून ठेऊया.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!