करोना : राज्यात आणखी 12 मृत्यू; बरे होणार्‍यांचा वेग वाढला

मृतांचा आकडा 419; सक्रिय बाधित 4 हजार 577. करंझाळे, सांतइनेज, रायबंदर, मिरामार, आल्तिनो या भागांत सापडले नवे बाधित.

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : करोनामुळे (corona) मंगळवारी राज्यातील आणखी बारा जणांचा मृत्यू झाला. 709 जण करोनातून मुक्त होऊन केवळ 381 नवे बाधित सापडले आहेत. करोनामुक्त होणार्‍यांची संख्या वाढत असल्याने राज्याला काही अंशी दिलासाही मिळत आहे.

चोवीस तासांत बारा जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 419 झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 577 झाली आहे. त्यामुळे करोनातून बरे होणार्‍यांचा टक्का वाढून तो 84.76 वर गेला आहे. तर चोवीस तासांत आणखी 312 जणांनी घरी राहण्याचा पर्याय स्वीकारल्यामुळे सद्यस्थितीत घरीच अलगीकरणात असलेल्यांची संख्या 15 हजार 239 झाली आहे.

नव्या बारा मृतांपैकी 8 जणांचा गोमेकॉत, तर दोघांचा मडगाव येथील कोविड इस्पितळात मृत्यू झाला. एका व्यक्तीला मृत्यू झाल्यानंतर म्हापसा येथील आझिलो इस्पितळात आणण्यात आले. एका बाधित व्यक्तीला उपचारांनंतर इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला होता. घरी गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. बाराही मृत व्यक्तींना इतर गंभीर प्रकारचे आजारही होते, अशी माहिती आरोग्य खात्याने दैनंदिन अहवालातून दिली आहे.

दरम्यान, राजधानी पणजीत नवे 27 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यासोबतच अनेकजण करोनामुक्तही झाले. त्यामुळे पणजीतील सक्रिय बाधितांची संख्या 267 वर आली आहे. करंझाळे, सांतइनेज, रायबंदर, मिरामार, आल्तिनो या भागांत नवे बाधित सापडल्याची माहिती महापौर उदय मडकईकर (uday madkaikar) यांनी दिली आहे.

वेग मंदावतोय, नियमावलीचे पालन आवश्यक
गेल्या काही दिवसांत करोनाबाधितांचे प्रमाण कमी होऊन मुक्त होणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गोमंतकीय जनतेतील करोनाबाबतची भीती हळूहळू दूर होत असल्याचे दिसून येत आहे. अजूनही अनेकजण करोना प्रसार रोखण्यासाठी आवश्यक मास्क, सॅनिटायझर तसेच शारीरिक अंतर या गोष्टींचे पालन करताना दिसत नाहीत. अशा व्यक्तींमुळे भविष्यात करोनाचा पुन्हा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारपूर्वक सरकारी नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!