हौशी रंगभूमीचा सम्राट जगतोय एकाकी हलाखीचे जगणे

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी- आपल्या एकापेक्षा एक सरस कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक नाटकांतून कधी काळी हौशी रंगभुमी संपन्न केलेला एक तपस्वी नाट्यलेखक सध्या आपल्या वृद्धापकाळात हलाखीचे एकाकी जगणे कंठीत आहे. हौशी रंगभूमीवर ज्यांच्या नाटकांनी कधी काळी मुक्त संचार केला आणि आजच्या घडीलाही त्यांच्या नाटकांचे प्रयोग अनेक ठिकाणी होताहेत तेच हे ज्येष्ठ नाट्यकर्मी आज आपल्या जीवनाच्या रंगभूमीवर मात्र एकाकी राहीले आहेत.

गोव्यातील पेडणे तालुक्यातील एक प्रतिथयश नाट्यलेखक ज्यांच्या नावावर तब्बल 55 पुस्तके आहेत. गेली अनेक वर्षे हौशी रंगभूमीवर ज्यांच्या नाटकांनी कलाकारांना भारूड घातलं होते ते रमाकांत पायाजी सध्या हलाखीचे जगणे जगत आहेत. त्यांची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी बनली असून सरकारने कलाकार कृतज्ञता मदत देऊन या कलाकारांना थोडा आधार द्यावा,अशी मागणी त्यांच्या निकटवर्तींयांकडून केली जात आहे.
गोवा, सिंधुदुर्ग, कर्नाटकात नाटके
पेडणे तालुक्यातील मुळ कोरगांव येथील रमाकांत पायाजी आपल्या तिन्ही मुलींची लग्ने केल्यानंतर आणि पत्तीचे निधन झाल्यानंतर सध्या मानसवाडा मुळगाव येथे एकटेच वृद्धापकाळाचे जीवन कंठत आहेत. सरकारकडून दर महिन्याला मिळणारे ३२०० रुपये ही त्यांच्यासाठी सध्या जगण्यासाठीची शिदोरी ठरली आहे. ते एकटेच राहत असल्याने आणि त्यांची काळजी घेण्यासाठी कुणीच नसल्याने त्यांची परिस्थिती दयनीय बनली आहे. काही स्वाभाविक मतभेदांमुळे त्यांच्या मुलींनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते एकटे पडले आहेत. किमान या परिस्थितीत त्यांना सरकारी वृद्धाश्रमात हलविल्यास त्यांच्यासाठी ते फायद्याचे ठरू शकते आणि त्या अनुषंगानेही प्रयत्न होण्याची गरज त्यांच्या काही निकटवर्तियांनी व्यक्त केली.
गोव्यासोबतच कर्नाटकातील मराठी भागात आणि सिंधुदुर्गमध्येही त्यांची नाटके सादर झालीत आणि बरीच गाजलीत. आत्तापर्यंत रमाकांत पायाजी यांना अनेक पुरस्कार मिळालेत. राज्य सन्मानाचा असा राज्यस्तरीय राज्य सांस्कृतिक पुरस्कार त्यांना 1999-2000 मध्ये प्राप्त झालेला आहे. तत्पूर्वी त्यांना राजभाषा खात्याचा बा. द. सातोस्कर भाषा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या व्यतिरीक्त अनेक मान सन्मान त्यांना प्राप्त झाले. आपले संपूर्ण जीवन त्यांनी लेखनासाठी अर्पित केले आणि त्यामुळे काही गोष्टींबाबत कुटुंबाकडे दुर्लक्ष आणि त्यांतून संसारात चढ उतारांचा त्यांना सामना करावा लागला.
निकटवर्तीयांचे मदतीसाठी प्रयत्न
रमाकांत पायाजी यांना आपले गुरू मानणारे आणि त्यांच्या नाट्य प्रवासाचे साक्षीदार असलेले त्यांची काही निकटवर्तीय त्यांची ही परिस्थिती पाहुन हेलावले आहेत. या उतारवयात आणि आरोग्याबाबत अनेक निर्बंध असताना ते एकटे राहणे खूपच कठीण बनणार असल्याने त्यांना अधिकृतरित्या सरकारी वृद्धाश्रमात हलवणे शक्य असेल तर सरकारने तसे प्रयत्न करण्याची गरज काहीजणांनी व्यक्त केली. कलाकार कृतज्ञता निधीचे सहाय्य देऊन त्यांच्यासाठी केअर टेकरची व्यवस्था करून त्यांना मदत करता येईल काय, अशाही पर्यायाचा विचार करता येईल,असेही अनेकांनी म्हटले आहे. त्यांच्या काही जवळीकांनी त्यांना ही मदत मिळावी म्हणून राज्य सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आता एवढ्या लौकिकप्राप्त या कलाकाराच्या कागदपत्रांअभावी ही मदत मिळू शकत नसल्याचे धोरण खात्याने अवलंबिल्याने मोठी अडचण बनली आहे. या परिस्थितीत ही कागदपत्रे शोधून काढणेही अशक्य बनले आहे आणि त्यांनी ती कुठे ठेवली आहेत, याचेही त्यांना भान राहीलेले नसल्याने या मदतीपासून ते दूरावले आहेत.
कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडेंनी लक्ष घालावं
राज्य कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालावं,अशी विनंती त्यांच्या काही चाहत्यांनी केली आहे. मुळातच कलाकारांचे उत्तरजीवन हे हलाखीचेच असते. संपूर्ण आयुष्यबळ कलेसाठी वाहुन घेतल्यानंतर कौटुंबिक जीवनात अनेक कलाकार अपयशी ठरतात आणि उत्तर वयात त्यांना हलाखीचे जगणे सोसावे लागते. या पूर्वानुभवामुळेच माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कलाकार कृतज्ञता निधीची संकल्पना पुढे केली होती. ही मदत अनेक कलाकारांसाठी जगण्याचा एक मोठा आधार ठरली आहे.
गोविंद गावडे यांनी आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना या कलाकाराची भेट घेऊन त्यांच्या परिस्थितीची माहिती जाणून घ्यावी आणि त्या अनुषंगाने राज्य पुरस्कारप्राप्त या कलाकाराला कसा आधार देता येईल, यासंबंधीचा निर्णय घ्यावा असेही या लोकांचे म्हणणे आहे. शेवटच्या टप्प्यात आपलेही दूरावतात आणि जेव्हा एखाद्यावर अशी वेळ येते तेव्हा कुणीही जबाबदारी घेण्यासाठी पुढे सरसावत नाही, अशावेळी सरकारलाच पुढाकार घेऊन आपल्या आदर्श प्रशासकीय व्यवस्थेचे दर्शन घडवावे लागणार आहे.