मुंबई ते गोवा प्रवास होणार अधिक सुखकर; गोव्यासाठी ‘वंदे भारत ट्रेन’चे असे असेल एकंदरीत वेळापत्रक

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 27 जून : भारतीय रेल्वेने गोव्यासाठी पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा केली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान ही ट्रेन धावणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील ही पाचवी वंदे भारत एक्सप्रेस आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेससाठी 22229 आणि 22230 असे ट्रेन क्रमांक दिले आहेत. ही ट्रेन शुक्रवार वगळता आठवड्यातून 6 दिवस चालेल. भारतीय रेल्वेला तसेच या दोन राज्यांच्या पर्यटन क्षेत्राला यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
“सध्या, गोव्यातील मडगाव स्टेशन ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतचा प्रवास, सुमारे 586 किमी अंतर कापून, सुमारे 11-12 तास लागतात. हे अंतर वंदे भारत ट्रेनने अवघ्या 8 तासांत कापले जाऊ शकते, ज्यामुळे प्रवाशांचे सुमारे 3-4 तास वाचतील,” असे भारतीय रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे.

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे संभावित वेळपत्रक
भारतीय रेल्वेनुसार मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची वेळ बिगर पावसाळी आणि पावसाळी हंगामासाठी वेगळी असेल.
पावसाळी हंगामासाठी वेळपत्रक असे असेल
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यात आठवड्यातून तीन वेळा चालवली जाईल. ट्रेन क्रमांक 22229 सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सीएसएमटी मुंबईहून 05:25 वाजता सुटेल आणि 15:30 वाजता मडगावला पोहोचेल आणि 22230 ही गाडी दर मंगळवार, गुरुवार आणि 12:20 वाजता मडगावहून सुटेल. शनिवारी 22:25 वाजता मुंबईला पोहोचणार.

बिगर पावसाळी हंगामासाठी वेळपत्रक असे असेल
ट्रेन क्रमांक 22229 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 05:25 वाजता सुटेल आणि 13:10 वाजता मडगाव स्थानकावर पोहोचेल आणि ट्रेन क्रमांक 22230 मडगाव स्थानकातून 14:40 वाजता सुटेल. 22:25 वाजता मुंबईला पोहोचणार.
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मार्ग
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम या सात स्थानकांवर थांबेल.

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस तिकिटाची किंमत
वंदे बहारत एक्सप्रेस प्रवाशांना निवडण्यासाठी एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार पर्याय देते. एसी चेअर कारसाठी मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे 1970 रुपये असेल. तथापि, एक्झिक्युटिव्ह चेअर कारची किंमत 3535 रुपये असेल. या शुल्कांमध्ये खानपान शुल्क समाविष्ट आहे.