प्रशासन तुमच्या दारी : मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी साखळी मतदार संघातील विविध पंचायतीमध्ये उपस्थिती, समजून घेतल्या जनतेच्या अडचणी

विरोधक मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात व्यस्त असल्याने, सरकारने केलेली विकास व अन्य लोकपयोगी कामे लोकांपर्यंत पोहचविण्याची आज गरज निर्माण झाली आहे

Goan Varta Live | प्रतिनिधी

गोवा स्वयंपूर्ण करणे हे आपले ध्येय असून त्यासाठी सरकारी यंत्रणा दिवसरात्र राबत असून राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

प्रशासन तुमच्या दारी अंतर्गत आजच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी साखळी मतदार संघातील विविध पंचायतीमध्ये उपस्थिती लावून जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. सूर्ला पंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले सरकार सदैव जनतेच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत फसव्या अफवांना जनतेने बळी न पडता सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची विनंती केली.

प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सरकारने केलेली विकास व अन्य लोकपयोगी कामे लोकांपर्यंत पोहचविण्याची आज गरज निर्माण झाली आहे कारण विरोधक मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात व्यस्त असल्याचे म्हणाले. सूर्ला सारख्या छोट्याशा गावात आज स्वयंपूर्ण मित्राच्या सहकार्याने अनेक यशस्वी उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगून शंभर पेक्षा अधिक महिलांना कला कौशल्याचे प्रशिक्षण देऊन काथाकाम, कुणबी साडी विणकाम करण्याचे व्यवसाय सुरु करण्यास मदत केल्याचे सांगितले.

18 वर्षे विनावापर पडून असलेली शेतजमीन स्वयंपूर्ण मिशन अंतर्गत स्वयंपूर्ण मित्राच्या सहकार्याने 16 लाख रुपये खर्च करून लावगडी खाली आणण्याची किमया सूर्ला गावातील शेतकऱ्यांनी करून दाखविली त्याबद्द्ल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी संबंधित शेतकऱ्यांचे विशेष कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर श्री. गोपाळ सूर्लकर, जिल्हा पंचायत सदस्य, श्र्वेतिका सचन, आय. ए. एस. अधिकारी, श्री. निलेश धायगोडकर, उपजिल्हाधिकारी, धारबांदोडा, स्थानिक सरपंच, उपसरपंच व पंच श्री. शैलेश काणेकर, स्वयंपूर्ण मित्र व अन्य उपस्थित होते.

तद्नंतर, श्र्वेतिका सचन, आय. ए. एस. अधिकारी, श्री. निलेश धायगोडकर, उपजिल्हाधिकारी, धारबांदोडा यांनी स्थानिक लोकांच्या समस्या व सूचना ऐकून घेतल्या व स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत केलेल्या कामांची पाहणी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!