अतिवृष्टीमुळे सुपारीवर संक्रांत

मोठ्या प्रमाणात गळ : सत्तरी, सांगे, फोंडा तालुक्यातील बागायतदार चिंतेत

विधिता प्रभू | प्रतिनिधी

पणजी : शेती, बागायतींसाठी पाऊस आवश्यक असला तरी त्याचे प्रमाण वाढले की नुकसान हमखास होतेच. यंदा बराचसा काळ संततधार कायम राहिल्याने राज्यात सुपारी पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पोफळींखाली गळलेल्या सुपार्‍यांची पखळण दिसून येत आहे. सत्तरी, सांगे, फोंडा तालुक्यातील बागायतदारांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
अति पावसामुळे सासष्टी तालुक्यात भात शेतीचीही हानी झाली आहे. दरम्यान, सुपारी हे भरीव उत्पन्न देणारे पिक आहे. राज्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांना सुपारी व काजूच्या पिकाचाच खास आर्थिक आधार! मात्र सुपारी गळण्याच्या प्रकारामुळे बागायतदार तसेच शेतकर्‍यांसमोर संकट उभे राहिले आहे.

विष्णू नाटेकर सांगताहेत आपबीती…

  • डिचोली तालुक्यातील सुर्ला गावातील प्रगतशील बागायतदार व कडचाळ सत्य किसान संंघाचे अध्यक्ष विष्णू नाटेकर याबाबत माहिती देताना सांगतात, पावसामुळे बागायतीतील 70 ते 75 टक्के सुपारी गळून पडली आहे.
  • औषध फवारणीचा काहीही फायदा झाला नाही. गेल्या वर्षीही सुपारी पिकाची अशीच हानी झाली होती. मात्र, यंदापेक्षा प्रमाण कमी होते.
  • सुपारीची गळ झाल्यानंतर कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी नुकसानीची पाहणी केली होती. परंतु, अद्याप भरपाई मिळालेली नाही.
  • बर्‍याच बागायतदारांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे. कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोविड महामारीत आता अतिवृष्टीमुळे आम्हाला मोठा फटका बसला आहे.

उपाय योजनेवर विचार व्हावा : अ‍ॅड. सावईकर
सुपारी गळण्याच्या प्रकारामुळे बागायतदारांचे बरेच नुकसान होत आहे. यावर उपाय काढण्यासाठी विचार व्हायला हवा, असे गोवा बागायतदार सहकारी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र सावइकर (Narendra Sawaikar) यांनी सांगितले. गोवा बागायतदार ही सुपारी उत्पादकांची सर्वांत मोठी संस्था आहे. शेतकरी तसेच बागायतदारांना फवारणीची औषधे येथून उपलब्ध करून दिली जातात. तरीही औषध फवारणीबाबत बागायतदारांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. यावर संस्था नक्कीच विचार करेल, असे अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे कोलेरोगाची होते लागण : कृषी अधिकारी
पाऊस अधिक पडल्याने सुपारीच्या घोसांवर (कात्र्यावर) पाणी साचते व ‘कोलेरोगा’चा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे सुपारी पिकण्यापूर्वी गळून पडते, अशी माहिती कृषी खात्यातील तांत्रिक अधिकारी विश्वनाथ नाईक यांनी दिली. पावसाचे प्रमाण वाढले तर वरील प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता अधिक असते, असेही ते म्हणाले.

कॉपर ऑक्सिफ्लोराईड किंवा बोर्डो मिश्रणाची फवारणी करणे हा ‘कोलेरोगा’चा उपाय आहे. ह्याची फवारणी योग्य वेळी व योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे. पावसाला सुरुवात झाली की ह्या औषधाची फवारणी करायला हवी. त्यानंतर वीस दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करायला हवी.

अधिकाधिक तीन वेळा ह्या औषधाची फवारणी करण्याची गरज आहे, असे विश्वनाथ नाईक यांनी सांगितले. बर्‍याचदा बागायतदार उशिरा औषधाची फवारणी करतात. यामुळे अपेक्षित लाभ होत नाही. तसेच औषधाची फवारणी केली आणि लगेचच पावसाचे प्रमाण वाढले तर औषध वाहून जाते. मे महिन्यात पावसापूर्वी सुद्धा औषध फवारणीचा उपयोग होत नाही. पावसाला उशिर झाला तर औषध सुकून जाण्याची शक्यता असते. यामुळे सदर औषधाची फवारणी योग्य वेळी होणे गरजेचे आहे. योग्य प्रमाण व योग्य वेळी फवारणी झाली, तरच ह्या औषधाचा अपेक्षित परिणाम होतो; अन्यथा होत नाही, असेही विश्वनाथ नाईक यांनी सांगितले. पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर सुपारीच्या घोसाला (कात्र्याला) ताडपत्री बांधली तर पाण्यापासून सुपारीचा बचाव होणे शक्य आहे. फळाच्या अधेमधे बराच काळ पाणी साचून राहिले की कोलेरोग होतो व सुपारी गळते, असे त्यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!