अन्यथा पेनडाऊन आंदोलन पुकारू…

कर्मचारी संघटनेची लिक्विडेटरना नोटीस; ठेविदारांच्या ठेवी परत करा; लिक्विडेटर हवालदार यांच्याकडे ठेवीदार संघटनेची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: म्हापसा अर्बन बँकेच्या कर्मचार्‍यांनी ग्रॅच्यूएलटी व रजा भूगतानसह (लिव्ह एन्कॅशमेंट) इतर कायदेशीर थकित पगार व इतर वैधानिक सेवांची पूर्तता त्वरित करावी, अन्यथा येत्या ३० मार्चपासून पेन डाऊन आंदोलन पुकारले जाईल, अशी नोटीस बँक कर्मचारी व अधिकारी संघटनेतर्फे बँकेचे लिक्विडेटर दौलतराव हवालदार यांना पाठविली आहे.

अद्याप देय वेतन रकमेचं वितरण नाही

बँक कर्मचारी व अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष नाईक जॉर्ज यांनी ही नोटीस बँकेच्या कर्मचार्‍यांमार्फत दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या बँकेचा बँकिंग परवाना गेल्या १६ एप्रिल २०२० रोजी रद्द केल्याची आपणास जाणीव आहे. बँकेचे ठेवीदारांची रक्कम आणि बँक कर्मचार्‍यांची कर्तव्याची ग्रॅच्यूएल्टी आणि रजा एन्कॅशमेंट सारखे थकित वेतन देण्यासाठी आपली लिक्विडेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आपण ठेवीदारांची रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. या प्रक्रियेस आमची कोणतीही हरकत नाही. पण आपण अद्याप बँक कर्मचार्‍यांची वैधानिक व कायदेशीर देय वेतनाची रक्कम वितरित केलेली नाही.

हेही वाचाः गोंयकारांनो जागे व्हा – मनोज परब

अन्यथा पेनडाऊन आंदोलन पुकारू…

बँकेच्या अहवालानुसार आपण काही कर्मचार्‍यांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार वितरित केलेला आहे. तर काही कर्मचार्‍यांचा पगार केलेला नाही. त्यामुळे पगार न मिळालेल्या कर्मचार्‍यांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. बँकेच्या जमा खर्चात कर्मचार्‍यांच्या वैधानिक कायदेशीर थकित रकमेची भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याला रिझर्व्ह बँक तसेच विमा आणि पत हमी महामंडळाने (डीआयसीजीसी) मान्यता दिली आहे. तरीही ही रक्कम दिली जात नसल्याने हा प्रकार मानवी हक्काचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे कर्मचर्‍यांची थकित कायदेशीर देय त्वरित अदा करावी, अन्यथा येत्या ३० मार्चपासून कर्मचारी व अधिकारी वर्गाला पेनडाऊन आंदोलन पुकारावे लागेल. दरम्यान, वरील मागण्यांची त्वरित पूर्तता न झाल्यास बँक कर्मचारी व अधिकार्‍यांना धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. पूर्वसूचना न देता बँकेच्या समोर आझाद मैदान पणजी, आरबीआय कार्यालयासमोर व इतर वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन केले जाईल, असा इशारा या नोटीसीत दिला आहे.

हेही वाचाः कोण होणार राज्य निवडणूक आयुक्त? अनुभवाच्या निकषामुळे नारायण नावतींना वगळले!

पैसे त्वरित करा

रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिलेल्या १५० कोटींच्या ठेवी ठेवीदाराला त्वरित परत कराव्या, अशी मागणी म्हापसा अर्बन बँक ठेवीदार संघटनेने लिक्विडेटर दौलतराव हवालदार यांच्याकडे केली आहे. गेली पाच वर्षं यातना भोगणाऱ्या ठेवीदारांना दिलासा द्यावा, असं आवाहन जोसेफ कार्नेरो, प्रभाकर साळगावकर व इतर पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.

हेही वाचाः गेल्या अर्थसंकल्पातील योजना कागदावरच

तरी एकाही ठेवीदाराला अजून पैसे मिळाले नाहीत

दरम्यान, या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं की, गेल्या वर्षी १६ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बन बँकेचा परवाना रद्द करून लिक्विडेटरची नियुक्ती केली होती. म्हापसा अर्बन बँकेत गेली ५ वर्षं लोकांच्या सुमारे ३५० कोटींच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांनी बँकेकडे दावे सादर केले होते. १० हजारापेक्षा कमी रकमेच्या ठेवी असलेल्या सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्यास रिझर्व्ह बँकेच्या विमा विभागाने मान्यता दिली आहे. १० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी असलेल्या लोकांच्या ठेवी परत करण्यासाठी आरबीआयने १४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आरबीआयचे दोन्ही आदेश घेऊन आता बराच कालावधी उलटला असला तरी एकाही ठेवीदाराच्या खात्यात अजून एक पैसाही जमा झालेला नाही.

विमा योजनेखाली त्वरित भरपाई द्यावी

दरम्यान, पाच लाखापर्यंत ठेवी असलेल्या सर्व ठेवीदारांना, विमा योजनेखाली त्वरित भरपाई द्यावी तसंच पाच लाखांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर परत मिळतील याची व्यवस्था रिझर्व्ह बँकेने करावी, अशी मागणीही ठेवीदार संघटनेने केली आहे.

हेही वाचाः मालवणात नौकेवर हल्ल्याचा प्रयत्न

ज्येष्ठ नागरिकांवर उपासमारीची वेळ

म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे गेली पाच वर्षं लोकांना बँकेत असलेले आपलेच पैसे काढता आलेले नाहीत. त्यामुळे बँकेतील ठेवीच्या व्याजावर गुजराण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना औषधे विकत घेण्यासाठी पैसे नसल्यानं त्यांचं आजारपणही वाढलं आहे. त्यामुळे आरबीआयने मंजुरी दिलेल्या छोट्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करून दिलासा द्यावा, असं आवाहन ठेवीदार संघटनेने केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!