‘हॉटेल लसीकरण पॅकेज’वर कारवाई करण्याचा आदेश !

आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून दिला आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : काही खासगी रुग्णालयं लक्झरी हॉटेल्ससोबत हातमिळवणी करत कोरोना लसीकरणाचं पॅकेज देत आहे. हे नियमांचं उल्लंघन असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून अधिकाऱ्यांना राष्ट्रीय कोरोना लसीकरण मोहीम राबवताना नियमांचं योग्य पालन होत असल्याची खातरजमा करण्यास सांगितलं आहे.

नियमांनुसार लसीकरण सरकारी किंवा खासगी केंद्र, कामाच्या ठिकाणी, सामाजिक केंद्र, पंचायत भवन, शाळा, कॉलेज, वृद्धाश्रम अशा ठिकाणी केलं जाऊ शकतं. तसंच ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी घराजवळ सोसायटींकडून लसीकरणाचं नियोजन केलं जाऊ शकतं. यांच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी लसीकरणाचं नियोजन करणं बेकायदेशीर असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. यामुळे मोठ्या हॉटेल्समध्ये लसीकरणं करणं नियमाला धरुन नसल्याकडे आरोग्य मंत्रालयाने लक्ष वेधलं आहे.

हॉटेल्सकडून कोविड लसीकरण पॅकेज दिलं जात असून यामध्ये राहण्याची सुविधा, ब्रेकफास्ट, डिनर, वायफाय याशिवाय विनंतीनुसार तज्ञ डॉक्टरांकडून लसीकरण अशी ऑफर दिली जात आहे. यावरुन सोशल मीडियावर टीकेचा सूर उमटला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!