राज्यपालांप्रती विरोधकांची कृती अयोग्य – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री सावंत यांनी विरोधकांच्या कृतीचा निषेध करणारे ट्वीट केलंय.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी घेतलेला आक्रमक पावित्रा आणि एकूणच घोषणाबाजी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बरेच संतापलेत. त्यांनी विरोधकांच्या या कृतीचा निषेध करणारे ट्वीट केलंय. सोमवारी विरोधकांनी सभागृहात राज्यपालांप्रती जी कृती केली ती आयोग्य आणि असंसदीय होती, असं मुख्यमंत्री म्हणालेत. विरोधकांनी आपल्या कृतीचं सिंहावलोकन करावं आणि लोकशाही मुल्यांचं जतन करतानाच लोकांच्या हितार्थ काम करावं, असाही सल्ला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिलाय.

ट्वीट युद्ध

मुख्यमंत्र्यांच्या या ट्वीटला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही सडेतोड प्रत्यूत्तर दिल्याने हे ट्वीट युद्ध बरंच रंगलय. दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या ट्वीटला दिलेल्या उत्तरात सरकारने जनतेच्या भावना आणि इच्छा – आकांक्षांची कदर करायला हवी असं त्यांनी म्हटलंय. जनतेचा आवाज सभागृहापर्यंत पोहचवणं हे विरोधकांचं कर्तव्य आहे. काही अॅक्शन या रिअक्शन्स म्हणून येत असतात. सरकारने सभागृहात विरोधकांचा सामना करण्याचं धारिष्ठ दाखवावं. विधानसभेत शॉर्टकटचा वापर न करता विरोधकांना सामोरं जावं, असं आव्हानच दिगंबर कामत यांनी केलंय.

विरोधकांना आयती संधी

ट्वीटवरचं हे वाक्युद्ध बरंच रंगलंय आणि त्याबाबत अनेकांच्या प्रतिक्रिया पडू लागल्यात. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं गोवा विधानसभेतलं पहिलं अभिभाषण सोमवारी होतं. रविवारी इफ्फीच्या समारोपात जंगी भाषण दिलेल्या भगतसिंग कोश्यारी यांना विधानसभेत एकण्यासाठी अनेकांना उत्सुकता लागली होती. आपल्या विशिष्ट शैलित ते बोलतात. गोव्यासंबंधी आपल्या अभिभाषणात ते कसं काय बोलतात यासाठी सर्वांच्या नजरा त्यांच्या अभिभाषणाकडे लागून राहील्या होत्या. त्यात विरोधकांनी त्यांचं सभागृहात आगमन होताच हातात फलक घेऊन ‘गोव्यात कोळसो नाका’ अशा घोषणा देत त्यांचं स्वागत केलं. आता कोश्यारी आपलं भाषण सुरू करणार तोच त्यांनी आपण हे भाषण पटलावर ठेवतोय, असं म्हटलं आणि सगळ्यांचीच निराशा झाली. यानंतर ते लगेच सभागृहातून निघून गेले. बरं एवढं करून झालं नाही. सोमवारीच राष्ट्रीय मतदारदिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तिथे राज्यपाल प्रमुख पाहुणे होते. तिथे मात्र त्यांनी भाषण केलं. विरोधकांना ही आयतीच संधी मिळाली. सरकार आणि राज्यपालांच्या या कृतीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्रातून ट्वीटरव्दारे जोरदार टोलेबाजी

भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल. गोव्याच्या राज्यपालांचा त्यांच्याकडे अतिरीक्त ताबा आहे. महाराष्ट्रात ते आपल्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सोमवारी गोवा विधानसभा अधिवेशनाला सुरूवात होतेय तोच त्याच दिवशी मुंबई आझाद मैदानावर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. आता हे शेतकरी राज्यपालांची भेट घेणार होते. राज्यपाल कोश्यारी तर गोव्यात असल्याने तेथील शेतकरी बरेच खवळले. या निमित्ताने अनेकांनी ट्वीटरच्या माध्यमाने राज्यपालांवर टोलेबाजी करून आपला राग व्यक्त केलाय. एकूणच गोवा आणि महाराष्ट्रात एकाच दिवशी भगतसिंग कोश्यारी हे मात्र बरेच गाजले हे बाकी खरं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!