अर्थसंकल्प, मतमोजणीबाबत विरोधक राज्यपाल, आयुक्तांकडे

सरकार जाणीवपूर्वक मागण्या मान्य करत नसल्याचाही आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: अर्थसंकल्प आणि पालिका निवडणुकांच्या मतमोजणीसंदर्भात विरोधकांनी गुरुवारी प्रथम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांची भेट घेतली. अर्थसंकल्प पुढे ढकण्याबाबत त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना, तर अकराही पालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी घेण्यासंदर्भात आयुक्तांना निवेदन सादर केलं.

हेही वाचा – भयंकर! 24 तासांत 4 कोरोना बळी, 4 पैकी तिघांना फक्त कोरोनाची बाधा

म्हणून राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली…

अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातील बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधकांनी आचारसंहितेचे कारण पुढे करून अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे ढकलण्याची लेखी मागणी सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे केली होती. म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे या पाच पालिकांच्या निवडणुकांसाठी राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू होईल. अशावेळी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन घेऊन आश्वासनं देऊ शकत नाही. त्यामुळे २४ आणि २५ मार्च रोजी सरकारने लेखानुदान मंजूर करून घ्यावे आणि पालिका निवडणुकांची मतमोजणी झाल्यानंतर अधिवेशन घ्यावं, असं लेखी पत्र विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, मगोचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी सभापतींना सादर केलं होतं. पण, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांची ही मागणी स्पष्टपणे फेटाळली होती. विरोधकांची प्रत्येक मागणी पूर्ण करता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर, अपक्ष आमदार प्रसाद गावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप यांनी गुरुवारी राजभवनावर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. आम्ही आमची मागणी राज्यपालांसमोर ठेवली आहे. त्यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ग्वाही आम्हाला दिली आहे, असे दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

मतमोजणी एकाच दिवशी घेण्यात यावी

दरम्यान, राज्यपालांच्या भेटीनंतर विरोधकांनी आपला मोर्चा गुरुवारीच ताबा घेतलेल्या नवनियुक्त राज्य निवडणूक आयुक्त रमणमूर्ती यांच्या कार्यालयाकडे वळवला. नोव्हेंबर २०२० मध्ये कर्नाटकातील निवडणुकांसंदर्भातील प्रकरणात निवडणूक दोन टप्प्यांत झाल्या तरी मतमोजणी एकाचवेळी घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला होता. त्याच निर्णयानुसार अकरा पालिकांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. त्यांची मतमोजणी वेगवेगळ्या दिवशी न घेता एकाच दिवशी घेण्यात यावी, अशी मागणी केली. आपण गुरुवारीच आयुक्तपदाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे अभ्यास करून पुढील निर्णय घेण्याची हमी रमणमूर्ती यांनी दिल्याची माहिती विरोधकांनी दिली.

हेही वाचा – Video | Exclusive | नव्या आरक्षणावरुन कोर्टात जाण्याचा दयेश नाईकांचा इशारा

मतमोजणीबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने अकरा पालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी घेतली पाहिजे. याबाबत अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. आयुक्तांनी आमची मागणी मान्य न केल्यास अधिवेशनात विरोधक संघटितरीत्या हा मुद्दा उपस्थित करतील. शिवाय आम्ही याप्रश्नी न्यायालयातही जाणार आहोत, असं गोवा फॉरवर्डच्या अध्यक्षांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!