आयआयटीला विरोध; पोलिसांकडून दोघांना अटक

सीमांकनाचे काम रोखले. प्रशासकीय अधिकारी माघारी. आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा.

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

वाळपई : शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पासाठी सीमांकन करण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांना मंगळवारी आंदोलकांनी विरोध केला. सुमारे सहा तास काम थांबवून ठेवण्यात आले. अखेर अधिकारी माघारी परतल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या अधिकार्‍यांनी आंदोलकांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे वाळपई पोलिसांनी रात्री उशिरा प्रशासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल काँग्रेसचे दशरथ मांद्रेकर आणि आपचे विश्वेश परोब यांना अटक केली.

सोमवारी मुख्यमंत्र्यांसमोर मागण्या ठेवल्या आहेत. त्या मान्य होईपर्यंत सीमांकनाचे काम करू देणार नाही. आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्यास जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिस फौजफाटा तैनात होता. तणाव लक्षात घेऊन उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र ती अयशस्वी ठरली. सीमांकनाचे काम सरकारच्या आदेशानुसार होत आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्यास कारवाई करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. कारवाई झाली तरीही सीमांकनाचे काम करू दिले जाणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. बुधवारी सीमांकनासाठी आल्यास पुन्हा विरोध केला जाईल, असेही सांगण्यात आले. सीमांकनासाठी आलेल्या अधिकार्‍यांनी दुपारी वाळपई पोलिसांत तक्रार नोंदवली.

आयआयटी प्रकल्पाद्वारे सरकार जनतेच्या व पर्यावरणाच्या मुळावर घाव घालत आहे. सरकार हा प्रकल्प लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहे. जनता हे कदापि सहन करणार नाही. जीव गेला तरी चालेल प्रकल्प हद्दपार होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
– उन्नती मेळेकर, आंदोलक

आंदोलन चिघळण्याची शक्यता
आयआयटी आंदोलनाला खतपाणी घालून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल वाळपई मतदारसंघ काँग्रेस समितीचे अध्यक्ष दशरथ मांद्रेकर आणि आम आदमी पक्षाचे विश्वेश परोब यांना पोलिसांनी भा.दं.सं. कलम 353 खाली मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. आंदोलकांवर गुन्हे नोंद केल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी मंगळवारी दिला होता. बुधवारी पुन्हा सरकारी अधिकारी सीमांकनासाठी येण्याची शक्यता आहे. बुधवारी पुन्हा येथे तणावाची स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!