भाजप निष्ठावंतांचे उघड बंड!

मनपातील पॅनेल ‘खासगी’ असल्याचा आरोप; धोंड, तानावडेंसह मुख्यमंत्र्यांवरही खापर

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी: पणजी महानगरपालिका (मनपा) निवडणुकीसाठी भाजपने अधिकृत पॅनेल जाहीर केलेले आहे. पण ज्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्याला पक्षाची कार्यपद्धत शिकवली, त्या कार्यपद्धतीने हे पॅनल तयार झालेले नाही असे म्हणत, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी संघटनमंत्री सतीश धोंड, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावरच खापर फोडले.

हेही वाचाः सर्वसामान्यांना मोठा फटका! गॅस सिलिंडरचे दर फेब्रुवारीत तिसऱ्यांदा वाढले

पक्षाच्या कोअर समितीला विश्वासात घेतलं नाही

गेल्या २० वर्षांपासून आपला भाजप उमेदवारांच्या निवडीत प्रत्यक्ष सहभाग असतो. यापूर्वी निवडणुकांसाठी उमेदवार देताना बूथ, मंडळ समित्यांशी चर्चा केली जायची. त्यानंतर पक्षाची कोअर समिती सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवार जाहीर करायची. पण, यावेळी पणजी मनपा निवडणुकीत पक्षाने या पद्धतीचा वापर केलेलाच नाही. त्यामुळे मनपासाठी जाहीर झालेलं पॅनेल पक्षाचं नसून खासगी आहे, असा आरोप नाईक यांनी केला. पक्षाचे नियम, कार्यपद्धत आपण तयार केलेली नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यापासून ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या संघटनमंत्री सतीश धोंड, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीच ही कार्यपद्धत तयार केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना आपण त्या मोर्चाच्या उत्तर गोव्याचा सचिव होतो. त्यावेळीपासून त्यांनी आपल्याला भाजप कार्यपद्धतीची शिकवण दिलेली आहे. त्यामुळे आपण आजही पक्षाच्या त्याच कार्यपद्धतीला मानतो, असंही ते म्हणाले.

दत्तप्रसाद नाईक

सर्वच नियमांना फाटा

मनपा निवडणुकीत ताळगावातील उमेदवार पणजीतील प्रभागात आणि पणजीचा उमेदवार ताळगावमधील प्रभागात देण्यात आला आहे. गेल्या २० वर्षांत असं कधीही झालेलं नव्हतं. पणजीचा कार्यकर्ता पणजीत आणि ताळगावचा कार्यकर्ता ताळगावातच काम करत होता. पण, यावेळी मात्र सर्वच नियमांना फाटा देण्यात आला आहे, असंही नाईक यांनी नमूद केलं.

हेही वाचाः राज्याच्या अर्थसंकल्पाकडे जनतेचं लक्ष

हेही पहाः Illegal | सांकवाळमध्ये कुणाच्या आशीवार्दानं अवैध बांधकाम?

मनपा निवडणुकीतील पॅनेल पक्षाचं नाहीच

पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी तर मनपा निवडणुकीतील पॅनेल पक्षाचं नाहीच, अशी आपली ठाम भूमिका असल्याचं स्पष्ट केलं. प्रदेशाध्यक्ष तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही याआधीच ही निवडणूक पक्ष पातळीवर होत नसल्याचं जाहीर केलं आहे. पक्ष आणि मनपा निवडणूक वेगवेगळी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसारच पुढे जाऊ, असं ते म्हणाले. पूर्वी निवडणुकांत उमेदवार देताना किंवा पॅनेल निवडताना पक्षाकडून कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जायचं. पण, आता कदाचित पक्षाची ध्येयधोरणं बदलली असावी. नेत्यांना कार्यकर्ते नको असावे. आपला पक्षाचे नेते आणि कोअर समितीवर विश्वास आहे. पक्ष आणि कार्यकर्त्यांचे हित लक्षात घेऊनच समितीने निर्णय घेतलेला असावा, असंही कुंकळ्येकर यांनी नमूद केलं.

सिद्धार्थ कुंकळ्येकर

पॅनेल भाजपच्या नीतीत बसत नाही : उत्पल

पणजी मनपासाठी भाजपनं जे पॅनेल दिलं आहे, ते पक्षाच्या नीतीमध्ये बसवणं कठीण आहे. त्यामुळे हे पॅनेल भाजपचं आहे असं स्पष्टपणे म्हणता येत नाही. पण ज्या आमदाराने पॅनेल जाहीर केलं तो भाजपचा आहे, असं उत्पल पर्रीकर म्हणाले. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पॅनेल निवडलं आहे की नाही, हे आपणास माहीत नाही. पण पॅनेलमधील अनेक उमेदवार पक्षाच्या नीतीमध्ये बसत नाहीत. समर्थनासाठी आपल्याला अनेकांचे फोन येत आहेत. पण वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतरच कोणाला पाठिंबा द्यावा, याचा निर्णय आपण घेणार असल्याचंही पर्रीकर यांनी नमूद केलं.

उत्पल पर्रीकर

जाहिरातीबाबत दत्तप्रसाद नाईक म्हणतात…

  • भाजप पॅनेलची घोषणा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजप कार्यालयातून केलेली नाही. त्यामुळे पॅनेलबाबत वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेली जाहिरात पक्षाची नसून, खासगी असल्याचं लक्षात येतं.
  • ती जाहिरात पक्षाची असती तर ती भाजप कार्यालयातून आली असती आणि त्या जाहिरातीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा फोटो निश्चित असता.
  • मनपा निवडणुकीत मूळ भाजप कार्यकर्ता पॅनेलमधून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असेल आणि त्याने आपणास मदतीसाठी हाक दिली, तर आपण त्याच्या मदतीसाठी निश्चित धावून जाणार.
  • भाजपात अनेकजण येतात आणि जातात. वारंवार पक्ष बदलतात. त्यामुळे आमदार बाबूश मॉन्सेरात यांच्याबाबत आपण काहीही बोलू इच्छित नाही.

हेही वाचाः आरक्षणाचा अधिकार सरकारचा, हस्तक्षेप करणार नाही!

हेही पहाः Politics | Reservation Issue | High court | पालिका आरक्षणाचा निकाल कुणाच्या बाजूनं लागणार?

बाबूशविरोधात आजी, माजी नगरसेवकांचे पॅनेल

पणजी मनपात आमदार बाबूश मॉन्सेरात यांना शह देण्यासाठी भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांचा सहभाग असलेले काही नेते ‘वुई पणजीकर’ या बॅनरखाली एकत्र आले आहेत. त्यांनी सिटीझन पॅनेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तीसही प्रभागांत उमेदवार उतरविण्याचं या नेत्यांनी निश्चित केलं आहे. माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, भाजप नगरसेवक मिनिन डिक्रूज, माजी नगरसेवक सुरेश चोपडेकर, मेलिसा सिमॉईश, संदीप हेबळे, अ‍ॅड. पुंडलिक रायकर, सय्यद साकीब काद्री हे ‘वुई पणजीकर’चे सहनिमंत्रक आहेत. या पॅनेलमध्ये भाजपच्या नाराज नगरसेवकांना संधी मिळणार असल्याने भाजपातील अंतर्गत वाद उफाळण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!