‘हिंमत असेल तर मालकीप्रश्नावर विश्वजीत राणेंनी चर्चा करावी’, सत्तरीवासीयांचं ओपन चॅलेंज

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : सत्तरीवासी प्रजासत्ताक दिनी वाळपईमध्ये एकवटले. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेल्या गुंतागुंतीच्या जमीन मालकीप्रश्नावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी लोकांनी स्थानिक आमदार आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना ओपन चॅलेंज दिलंय.
हिंमत असेल तर विश्वजीत राणेंनी जमीन मालकीच्य प्रश्नावर बोलण्यासाठी पुढे यावं आणि आमच्याशी थेट चर्चा करावी, असं आव्हान देण्यात आलं. स्थानिकांसोबत सत्तरी तालुक्याचे नागरीक आणि वकील शिवाजी देसाई यांनी विश्वजीत राणेंना आव्हान दिलं. तुम्ही चर्चेसाठी नाहीतर मी येतो आणि जमीन प्रश्नावर चर्चा करु, असं शिवाजी देसाई यांनी यावेळी नमूद केलंय. तसंच स्थानिक राजकीय नेते जमीन मालकीप्रश्नावर दिशाभूल करत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

सरकारसमोर ठराव
आजच्या या ऐतिहासिक उठावात वाळपईतील लोकांकडून सरकारकडे ४ ठराव सादर करण्यात आलेत. या ठरावाच्या माध्यमातून त्यांनी सरकारसमोर आपल्या काही मागण्या ठेवल्या आहेत. सत्तरी तालुक्यात एकुण ७१ महसुली गावे असून प्रत्येक गाव हे त्या गावातील गावकऱ्यांच्या पुर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी “खुटी मारून मठी जोडून” वसवला. ही गावे वसल्यापासून ते आजवर जी पिढी तेथे वास्तव्य करून आहे ती घरे ज्या जमीनीच्या सर्वे क्रमांकामध्ये आहेत ती जमीन “गावठण” या नावाने ओळखली जाते. त्यामुळे सत्तरी तालुक्यातील प्रत्येक गावात असलेल्या गावठणातील घरांच्या जमीनीची मालकी ही त्या घरमालकाला देण्यात यावी, असा ठराव येथील लोकांनी सरकारसमोर मांडलाय.
अन्यथा आमरण उपोषण
जोपर्यंत संपूर्ण जमीन मालकी मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सरकारनं जमीन मालकीचा प्रश्न तातडीनं सोडवून लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ – खरंच अल्वारा जमीन सरकारची आहे का?