मडगावात ईएसआय हॉस्पिटलात ओपीडी सुरू

पहिल्या दिवशी 25 रुग्णांची तपासणी; आतापर्यंत कोविडच्या 4500 रुग्णांना सेवा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: राज्यात करोना महामारी सुरू झाल्यानंतर ईएसआय हॉस्पिटलला 25 मार्चपासून कोविड हॉस्पिटल करण्यात आलं. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 4500 रुग्णांवर उपचार करण्यात आले. पहिल्या लाटेत रुग्ण बरे होण्याचा 93 टक्के, तर दुसर्‍या लाटेत 98 टक्के राहिलेला आहे. गुरुवारपासून ओडीपी सुरू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी 25 रुग्णांना तपासण्यात आलं, अशी माहिती डॉ. विश्वजीत फळदेसाई यांनी दिली.

16 मार्च 2020 ईएसआय हॉस्पिटलात ठरवला पहिला कोविड वॉर्ड

करोना कालावधीतील ईएसआयच्या कामाबाबत डॉ. फळदेसाई यांनी सांगितलं की, 16 मार्च 2020 रोजी ईएसआय हॉस्पिटलात कोविड वॉर्ड करण्याचं ठरवून पहिल्यांदा केवळ दोन मजले घेण्यात आले. त्यानंतर 25 मार्च रोजी पूर्ण हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल करण्याचं ठरवण्यात आलं. डॉ. एडविन हे गोमेकॉमधून आलेले पहिले वैद्यकीय अधिकारी होते. सात रुग्ण दाखल होते, ते पूर्ण बरे होऊन डिस्चार्ज झाले. दरम्यान वास्को व इतर भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. पहिल्या लाटेत तीन हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यातील 93 टक्के रुग्ण बरे झालेले आहेत.

राज्यात कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर झालेले ईएसआय हे पहिलं हॉस्पिटल

राज्यात कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर झालेले ईएसआय हे पहिले हॉस्पिटल होते. गोमेकॉत कोविड रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले नव्हते आणि दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलचं काम पूर्ण होणं बाकी होतं. पहिल्या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागताच सर्व साधनसुविधांनी युक्त असलेले आणि रुग्णांवर उपचार होत असलेले हॉस्पिटल म्हणून पाहणीनंतर ईएसआयला कोविड हॉस्पिटल करण्यात आलं. सुरुवातीला ईएसआयचे अधिकारी आणि कर्मचारी होते. त्यानंतर गोमेकॉ व आरोग्य संचालनालयाकडून वैद्यकीय अधिकारी पाठवण्यात आल्या. सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या एकत्रित कामामुळे पहिल्या लाटेला तोंड देण्यात यशस्वी ठरलो. वैद्यकीय अधिकारी, हाउसकिपिंग, सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी असे सुमारे 900 कर्मचार्‍यांनी पहिल्या लाटेवेळी ईएसआय हॉस्पिटलात रुग्णांना सेवा देण्याचे काम केले, असे डॉ. फळदेसाई म्हणाले.

हेही वाचाः गाडेवाल्यांना नव्याने जागा देण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

पहिल्या लाटेपासून गोमेकॉतील वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक याठिकाणीच ठेवण्यात आले होते. तर ऑगस्टमध्ये डॉ. उदय काकोडकर हे नोडल अधिकारी म्हणून दाखल झाले. डिसेंबर 2020 च्या दुसर्‍या आठवड्यात पहिल्या लाटेतील आढळून आलेले ईएसआय हॉस्पिटलात दाखल रुग्ण बरे होउन घरी परतले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये युके स्ट्रेन सापडलेले एकूण 64 रुग्ण ईएसआय इस्पितळात उपचार घेत होते. त्या सर्व रुग्णांनाही उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आल्याचे डॉ. फळदेसाई म्हणाले.

हेही वाचाः शिवसेनेनं दोन तास रोखला महामार्ग

राज्यात दुसरी लाट आल्यानंतर 18 एप्रिलपासून पुन्हा ईएसआय हॉस्पिटलात रुग्णांना दाखल करुन घेण्यात आले. 28 जूनला ईएसआय हॉस्पिटलातील सर्व कोविडचे रुग्ण बरे होउन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 1500 रुग्णांवर दुसर्‍या लाटेमध्ये हॉस्पिटलात उपचार करण्यात आले व रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के राहिला आहे तर 21 रुग्णांचा मृत्यू झालेला होता. औषधे व ऑक्सिजनच्या पुरवठ्यात कोणतीही कमी झालेली नाही. दुसर्‍या लाटेतील रुग्णांचे नियोजन हे ईएसआय हॉस्पिटलातील कर्मचार्‍यांनी केले. यासाठी डॉ. एडविन व गोमेकॉतील इतर चार वैद्यकीय अधिकार्‍यांचेही सहकार्य लाभलं. त्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेतील रुग्णांना उपचार देण्याचे चांगले नियोजन झालं होतं.

फ्ल्यू ओपीडी ठेवणार सुरू

हॉस्पिटलातील सर्व मजले वापरण्यात आले असल्याने मागील दोन दिवस हॉस्पिटलात स्वच्छता व निर्जतुकीकरण करण्यात आलं. यापुढे फ्ल्यू ओपीडी सुरू ठेवणार असून करोनाची लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी सस्पेक्ट वॉर्ड तयार ठेवणार. याशिवाय पुरुष व महिलांना उपचाराकरता दाखल करुन घेण्यासाठी दोन मजल्यांवर सुविधांची तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय नेहमीची कॅज्युअल्टी विभाग सुरू होईल. आरोग्य केंद्राप्रमाणे हॉस्पिटलातही लसीकरण केंद्र करुन ईएसआयच्या लाभार्थ्यांना लस देण्याचा विचार आहे, असे डॉ. विश्वजीत फळदेसाई म्हणाले.

आवश्यकता पडल्यास पुन्हा कोविडसाठी काम करण्याची तयारी

करोना महामारी संपली असे म्हणता येणार नाही, त्यामुळे लसीकरण करुन घेत काळजी घेण्याची गरज आहे. ईएसआयकडून रुग्णसेवा देताना मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य संचालनालय, गोमेकॉचे वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल व इतर कर्मचार्‍यांच्या सहकार्यानेच कोविडचा हा लढा देण्यात आला. आवश्यकता पडल्यास कधीही 24 तासांत पुन्हा इस्पितळात कोविड रुग्णांना सेवा देण्याची तयारी असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांना सांगितलेलं आहे, असे ईएसआय हॉस्पिटलचे डॉ. विश्वजीत फळदेसाई यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!