अबब! राज्यात फक्त तीनच वाघ

अखिल भारतीय वाघ जनगणनेत 2018 मध्ये फक्त तीन वाघांची नोंद झालीय.

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी

पणजीः राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधीकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी तयार केलेल्या अखिल भारतीय वाघ जनगणनेत 2018 मध्ये फक्त तीन वाघांची नोंद झालीय. याच अहवालानुसार राज्यात एकूण 86 बिबट्यांचीही नोंद झाल्याचं म्हटलंय. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांच्या एका प्रश्नावर वनमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिलीये.

गेल्या दहा वर्षांतील वाघांची संख्या

गेल्या दहा वर्षांच्या वाघांची संख्या आमदार रेजिनाल्ड यांनी विचारली होती. याचबरोबर किती वाघ मेले आणि त्याची कारणं काय, असाही सवाल केला होता. या अनुषंगाने वन खात्याने दिलेल्या माहितीत 2020 मध्ये एक वाघिण आणि त्याची तीन पिल्लं मेल्याची माहिती देताना त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.

वाघ संवधर्नासाठी राज्य सरकारच्या उपाययोजना

वाघ संवर्धनासाठी राज्य सरकारकडून कोणकोणत्या उपाययोजना आखण्यात आल्यात, या प्रश्नावर माहिती देताना वाघांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या गुरांच्या भरपाईची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि जलद करण्यात आल्याचं तसंच म्हादई अभयारण्य क्षेत्रात दोन शिकार विरोधी पथके आणि दोन शिकार देखरेख पथके स्थापन करण्यात आली असून त्यांची या संपूर्ण परिसरात नजर लागून राहीलेली असते असं सांगण्यात आलंय. राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधीकरण आणि वन्यजीव संस्था यांनी तयार केलेल्या एमस्ट्रीप्स या विशेष अ‍ॅपच्या मदतीने वन्यजीवांच्या हालचालींवर विशेष नजर ठेवली जात असल्याचं या उत्तरात सांगण्यात आलंय. वाघांना सुलभतेने शिकार मिळावी या अनुषंगाने सुधारणा घडवून आणल्याचेही याठिकाणी नमुद करण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!