जीपीएससी परीक्षेत फक्त ७ जण उत्तीर्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : गोवा लोकसेवा आयोगाने नागरी सेवेच्या कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याची २२ पदे भरण्यासाठी परीक्षा घेतली होती. या पदासाठी पात्र ठरलेल्या ३,५८० पैकी फक्त ७ उमेदवार उत्तीर्ण झालेत. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. आयोग एक-दोन दिवसांत उत्तीर्ण उमेदवारांची सरकारला शिफारस करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
हेही वाचाः CA ते IAS प्रवास करणाऱ्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रूचिका कत्याल
३,५८० उमेदवारांनी दिली परीक्षा
गोवा लोकसेवा आयोगाने नागरी सेवेच्या कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांच्या २२ पदांसाठी १० जानेवारी २०२० रोजी जाहिरात दिली होती. त्यानुसार २२ पैकी १५ सर्वसाधारण, ५ इतर मागासवर्गीय, १ अनुसूचित जाती आणि १ पद अनुसूचित जमाती गटासाठी ठेवण्यात आले होते. सर्वसाधारण पदाच्या उमेदवारांना उत्तीर्णसाठी लेखी परीक्षेत ६५ टक्के गुण, इतर मागासवर्गीयसाठी ५५ टक्के, तर अनुसूचित जाती व जमातीसाठी ५० टक्के गुण आवश्यक होते. या पदांसाठी ३,६०० उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यांतील ३,५८० उमेदवार पात्र ठरले होते.

कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलली
मार्च २०२० मध्ये होणारी लेखी परीक्षा करोनामुळे नोव्हेंबरमध्ये घेण्यात आली. त्यात फक्त ७ उमेदवार उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण उमेदवारांची १७ फेब्रुवारी २०२१ रोजी मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत सर्वसामान्य गटात १५ पदांसाठी शुभम मोहन नाईक, गणेश कृष्णकुमार बर्वे, योगीराज प्रकाश गोसावी, अश्विनी अभय गावस देसाई, गिरीश गोपाल सावंत, इतर मागासवर्गीय गटात पाच पदांसाठी सीताराम गुरुदास सावळ आणि मनोहर लवू कारेकर हे उत्तीर्ण झाले. अनुसूचित जाती व जमातीसाठीच्या प्रत्येकी एका पदासाठी कोणीही उत्तीर्ण झाले नाही. उमदेवारांची उपजिल्हाधिकारी, उपसंचालक, अवर सचिव व इतर संबंधित पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.
हेही वाचाः गुंडगिरी संपवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील
म्हणून अनेक उमेदवार अपात्र
इतर राज्यांच्या लोकसेवा आयोगात उत्तीर्णसाठी किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. गोव्यात मात्र ही टक्केवारी जास्त असल्यामुळे अनेक उमेदवार अपात्र ठरले. ही टक्केवारी इतर राज्यांप्रमाणे करावी, अशी मागणी होत आहेत.