ऑनलाईन शिक्षणामुळे मानसिक, बौद्धिक, भावनिक विकासाला खीळ

तज्ज्ञांचे मत : प्राथमिक स्तरावरील शैक्षणिक पद्धत बदलण्याची गरज

नारायण गवस | प्रतिनिधी

पणजी: दीड वर्षापासून शाळा बंद राहिल्यानं प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणाऱ्या मुलांमधील सांघिक भावना मंदावली असून ही मुलं चिडचिडी बनत चालल्याच्या तक्रारी पालकांकडून येऊ लागल्या आहेत. अशाप्रकारे मानसिक, बौद्धिक, भावनिक विकासाला खीळ घालणाऱ्या ऑनलाईन शैक्षणिक पद्धतीत लवकरात लवकर योग्य ते बदल करणं आवश्यक आहे, किंवा योग्य काळजी घेऊन शाळा सुरू करणं हिताचं ठरेल, असं मत राज्यातील शिक्षणतज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचाः पॅरालिम्पिक्सच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला नेमबाजीत सुवर्णपदक!

दीड वर्षांपासून सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे-तोटे याविषयी सध्या पालकांसह शिक्षकांतूनही चर्चा सुरू झाल्या आहेत. काही शाळांनी तर मुलांचा सर्व्हे केला आहे. शिवोली येथील कीर्ती विद्यालयाने राज्यातील विविध शाळांतील इयत्ता १० ते १६ वर्षं वयोगटातील मुलांचा सर्व्हे करून गेल्याच आठवड्यात तो अहवाल शिक्षण खात्याला सादर केला आहे. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणतज्ज्ञ पांडुरंग नाडकर्णी, मानसोपचारतज्ञ डॉ. प्रियंका सहस्रभोजने आणि शिक्षण क्षेत्राचा दीर्घ अनुभव असलेल्या प्रा. पौर्णिमा केरकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील मत व्यक्त केलं आहे. दीड वर्षापासून मुलं चार भिंतीच्या आत बसून शिक्षण घेत असल्यानं ती एकलकोंडी होण्याची भीती आहे. मुलांचे मैदानी खेळही बंद झाल्यानं त्यांच्या शारिरीक क्षमतांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलचं व्यसन जडून त्यांच्या ज्ञानार्जनावरही परिणाम होत आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

पांडुरंग नाडकर्णी म्हणतात…

– दीड वर्ष शाळा बंद असल्याचा सर्वाधिक परिणाम प्राथमिक विद्यालयाच्या मुलांवर झाला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ग्राम शिक्षण समिती स्थापन करून सुरू करता येऊ शकतात. करोनाची ​स्थितीचा आढावा घेऊन सरपंच, पंचायत सदस्य, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी आणि शिक्षक यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा.
– शाळा ऑनलाईन असल्यानं मुलांचं आपल्या मित्रासोबत खेळणं कमी झालं आहे. घरात बसून मुलं एकलकोंडी होण्याची भीतीही आहे. तसंच प्रत्येकवेळी मोबाईलचा वापर अती होत असल्यानं भविष्यात मुलांमध्ये दृष्टी दोषासारख्या व्याधीही जडू शकतात. शाळेत शिक्षकाकडून जे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळते, ते ऑनलाईन शिक्षणातून मिळत नाही.

हेही वाचाः जमावबंदी लागू ठेवण्याच्या निर्णयाला पुन्हा ७ दिवसांची मुदतवाढ

चिडचिड वाढल्यास डॉक्टरांकडे जा!

दीड वर्षापासून मुलं घरातच बंद असल्यानं त्यांच्यात चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता आहे. तसं जाणवल्यास पालकांनी वेळीच सावध भूमिका घेणं गरजेचं आहे. पालकांनी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुलांच्या केवळ बौद्धिक शिक्षणावरच भार न देता त्यांच्या आवडीनिवडी पहाव्यात. त्यांना निसर्गात फिरायला न्यावं. जेणेकरून मुलांचं मन शांत आणि स्थिर राहील, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रियंका सहस्रभोजने यांनी दिला आहे.

‘पालकांनी मुलांचे मार्गदर्शन करावं’

मुलांमध्ये चिडचिडेपणा आढळून येत असल्यास पालकांनी त्यांना योग्य पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलं नैसर्गिक शिक्षण विसरत चालली आहेत. ही मुलं चार भिंतींच्या आत कोंडून असल्यानं त्यांना त्यांच्या आवडीचं काम द्या. त्यांना लहानपणीच घरातील कामात व्यस्त ठेवा. घराशेजारील बागेत, शेतात घेऊन चला. मुलांसोबत पालकांनी काहीवेळ एकत्र घालवावा. एकत्र जेवण करावं. या वयात मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते, असं मत प्रा. पौर्णिमा केरकर यांनी व्यक्त केलं.

हा व्हिडिओ पहाः GOA LAW COMMISSION | गोवा कायदा आयोगाचं आयुक्तपद रिक्त का ?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!