‘दिष्टावो’मुळे स्वयंपूर्ण शिक्षणास प्रारंभ : मुख्यमंत्री

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
पणजी : ‘दिष्टावो’ या ऑनलाईन वाहिनीमुळे गोव्यात (GOA) स्वयंपूर्ण शिक्षणाची सुरुवात झाली आहे. या वाहिनीमुळे राज्यातील उच्च शिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणात ऑनलाईन शिक्षणाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यादृष्टीने ‘दिष्टावो’ गोव्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
उच्च शिक्षण संचालनालयाने तयार केलेल्या ‘दिष्टावो’ वाहिनीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, डॉ. अनिल डिंगे, वंदना नाईक, प्रा. विठ्ठल तिळवे आदी उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाचे प्रशिक्षण देऊन असे शिक्षण सुरू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. भविष्यात करोनासारखी परिस्थिती उद्भवल्यास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठीच ‘दिष्टावो’ची निर्मिती करण्यात आली असून, त्याचा सर्वच विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
‘ई-मित्र’मुळे इंटरनेट समस्या मिटेल!
करोनामुळे निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीत सरकार खर्चावर नियंत्रण आणत आहे. विविध प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो. ऑनलाईन (ONLINE) शिक्षण देण्यासाठीही अनेक कंपन्या सरकारकडे आलेल्या होत्या. त्यांना सहभागी करून घेतले असते, तर सरकारचे कोट्यवधी रुपये खर्च झाले असते. पण उच्च शिक्षण संचालनालयाने अवघ्या काही हजारांत ‘दिष्टावो’ची निर्मिती केली. याशिवाय स्वयंपूर्ण गोवा मोहिमेचा सर्वेही मोफत करून दिला. त्यामुळे सरकारच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपये वाचले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. यापुढे 40 टक्के शिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) घेतला आहे. त्यामुळे ‘दिष्टावो’ वाहिनी राज्यात कायम सुरू राहील, अशी माहिती प्रसाद लोलयेकर यांनी दिली. करोनाची संधी साधून खास विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या या वाहिनीचा महाविद्यालये तसेच विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात इंटरनेटचे जाळे नसल्यामुळे अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे ‘दिष्टावो’ वाहिनीवरून व्हिडिओ अपलोड करून घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय ऑनलाईन शिक्षणाअंतर्गत ‘ई-मित्र’ ही नवी संकल्पना राबविण्यात येणार आहे. इंटरनेट असलेल्या आणि नसलेल्या विद्यार्थ्यांची जोडी ठरविण्यात येईल. त्यामुळे इंटरनेट (INTERNET) नसलेल्यांना इंटरनेट असलेल्यांकडे जाऊन ऑनलाईनअभ्यासक्रम पूर्ण करता येईल, असे प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.
काय आहे ‘दिष्टावो’?
- – ऑनलाईन शिक्षणासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने तयार केलेली वाहिनी
- – सर्वच विभागांतील अभ्यासक्रमांचे व्हिडिओ (VIDEO) उपलब्ध असतील
- – आतापर्यंत 3,500 व्हिडिओ रेकॉर्ड, 2,500 व्हिडिओंवर काम सुरू, 1 हजार अपलोड (UPLOAD) केले आहेत
- – वर्षभरात सर्वच विभागांचे 20 हजार व्हिडिओ उपलब्ध असणार
- – राज्यभरातील 1,200 शिक्षक सहभागी
- – 55 पेक्षा अधिक जणांची तांत्रिक टीम कार्यरत
- – गोवा विद्यापीठ, चौगुले महाविद्यालयाचे सहकार्य
मुख्यमंत्र्यांकडून ‘प्रुडंट’चे कौतुक
करोना काळात प्रुडंट वाहिनीने ‘प्रुडंट स्कॉलर’ उपक्रम सुरू केल्याने त्याचा मोठा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना झाला, असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रुडंट वाहिनीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक संकट उभे राहू नये यासाठी प्रुडंटने ऑनलाईन शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी नमूद केले.
It is a proud moment for all of us today as we launch #DISHTAVO, the Digital Integrated Systems of Holistic Teaching and Virtual Orientations. https://t.co/eAO0Vl4CtL pic.twitter.com/lVynLB4kol
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) October 5, 2020