रेशनकार्डवर मिळणार एक किलो कांदा

राज्यात दोन ट्रकांतून ५० टन कांदा दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात 50 मेट्रिक टन कांदा दाखल झाला आहे. त्यामुळे सुरुवातीला रेशनकार्डावर प्रत्येकी 1 किलो कांदा दिला जाणार आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत रेशनकार्डावर 1 किलो कांद्याचे वाटप केले जाईल. 34 रुपये 50 पैसे प्रतिकिलो दराने कांद्याची विक्री केली जाईल.

बाजारात कांदा बराच महाग झाला आहे. चांगल्या दर्जाच्या कांद्याचा दर 80 रुपये प्रतिकिलो आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी रेशनकार्डावर 3 किलो कांदा 32 रुपये प्रतिकिलो दराने देण्याचा निर्णय सरकारने मागील आठवड्यात घेतला होता. 1,045 मेट्रिक टन कांदा ‘नाफेड’कडून घेण्याचा निर्णय झाला. सरकारने नाफेडला ऑर्डरही दिली आहे.

त्यापैकी 50 मेट्रिक टन कांदा राज्यात पोहोचला आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे संचालक सिद्धिविनायक नाईक यांनी दिली. उर्वरित सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर गुरुवारपासून स्वस्त धान्य दुकानांमार्फत कांद्यांचे वाटप केले जाईल. हा कांदा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी प्रत्येक रेशनकार्डावर 1 किलो कांदा दिला जाईल. त्यानंतर किती कांदा द्यायचा याचा निर्णय 15 नोव्हेंबरनंतर घेण्यात येईल. तोपर्यंत तरी 1 किलो कांदा मिळेल, असे सिद्धिविनायक नाईक यांनी सांगितले.

सर्व कांदा एकाच वेळी आला तर तो साठवून ठेवण्याबरोबरच त्याचे वितरण करणे कठीण होईल. फलोत्पादन महामंडळाच्या गाड्यांवरही कांद्याचा दर परवडण्यासारखा नाही. कांदा दरवाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसतर्फे मडगाव आणि पणजी येथे 25 रुपये किलो दराने कांद्याची विक्री करण्यात आली होती.


रेशन दुकान मालकांचे प्रश्न

१. ग्राहकांना कांदा निवडीचे स्वातंत्र्य द्यायचे की आम्ही देऊ तो कांदा ग्राहकांनी घ्यायचा ?
२. कांदा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध कशी करायची ?
३. कांदे कुजले तर त्याचे काय करायचे ?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!