सरकारचा कांदा सासष्टीत पोहोचलाच नाही

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
मडगाव : नागरी पुरवठा खात्यातर्फे दिला जाणारा सवलतीच्या दरातील कांदा सासष्टी तालुक्यातील बहुतेक भागांमध्ये अद्याप पोहोचलेला नाही. 35 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असलेला कांदा मिळविण्यासाठी लोकांनी रेशन दुकानांवर अनेक खेपा मारल्या. मात्र त्यांना कांदा आला नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
कुडतरी येथील एका सोसायटीच्या चेअरमननी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून आलेला कांदा खाण्याच्या योग्यतेचा नव्हता. बहुतेक कांदा सडलेला असल्यामुळे तो परत पाठविण्यात आला. दरम्यान, फोंड्यातही कांद्याबाबतचा घोळ कायम असून रेशन दुकानांवर सडलेला कांदा मिळत असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
मंत्री गावडेंकडून नागरिकांना, रेशन दुकानदारांना दिलासा
दरम्यान, नागरी पुरवठा खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी रेशन दुकानदारांना दिलासा देताना सडलेला कांदा सरकार परत घेणार असल्याचं म्हटलंय. खुल्या बाजारात कांदा 100 रुपये प्रतिकिलो झाल्यामुळे सरकारनं महाराष्ट्रातून कांदा आयात केली. रेशनकार्ड धारकांना 35 रुपये किलो दराने कांदा देण्याची योजना आखली आणि कार्यान्वितही केली. मात्र काही ठिकाणी सडलेला कांदा पोहोचल्याच्या तक्रारी आल्यात. त्या ठिकाणचा कांदा सरकार परत घेणार असून रेशन दुकानदारांनी गोंधळून जाण्याची गरज नाही.
ग्राहकांनीही कांद्याबरोबरच निकृष्ट दर्जाचं धान्य मिळत असेल, तर संबंधितांच्या लक्षात आणून द्यावं. ते धान्यही बदलून दिलं जाईल. कांदा घाउक पद्धतीनं आणला जात असल्यानं तो खराब होणं साहजिक आहे. त्यामुळे सरकारने हा कांदा परत घेण्याची तयारी ठेवली आहे. वितरण व्यवस्थेत काही त्रुटी असतील, तर लोकांनी सूचना कराव्यात. आम्ही नक्कीच त्यावर सकारात्मक निर्णय घेउ, असं गावडे म्हणाले.