माहेरी गेलेली बायको दुसऱ्या दिवशी घरी परतली, आणि पाहिला…

सांकवाळ येथे एकाची आत्महत्या; मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा संशय

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः वास्को शहरातील सांकवाळ या भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. या भागात राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना घडलीये.

नक्की काय प्रकार?

सिंपला सांकवाळ येथील आदित्य ऊर्फ चिंतामणी यादव (वय ४३) याने आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सांकवाळ येथील सप्तगिरी अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडलाय. पत्नी माहेरी गेल्यानंतर पतीने आपल्या फ्लॅटमधील साहित्याची नासधूस करून गळफास लावून आत्महत्या केल्याचं समजतंय. माहेरी गेलेली पत्नी सोमवारी सकाळी परत आली असता हा प्रकार उघडकीस आला.

मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा संशय

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. आदित्य हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याचं समजतंय.

रविवारी रात्री नवरा-बायकोमध्ये भांडण

रविवारी (१९) रात्री काही कारणावरून आदित्यसोबत वाद निर्माण झाल्याने आपल्या मुलीसह त्याची पत्नी आईच्या घरी निघून गेली होती, अशी माहिती तिने पोलिसांना दिली. दरम्यान, आपलं बरंवाईट झाल्यास त्याला कोणीही जबाबदार नाही अशा आशयाचं स्टेटस त्याने काही वेळापूर्वी टाकल्याची माहिती पोलिसाना चौकशीवेळी समजली. फ्लॅटमधील बहुतेक साहित्याची नासधूस झाल्याचा पोलिसांना तपासणीवेळी दिसून आलं आहे. पत्नीशी वाद निर्माण झाल्यानं आदित्यनेच घरातील साहित्याची नासधूस केली असण्याचा कयास पोलीस व्यक्त करत आहेत.

सोमवारी सकाळी घरी परतल्यावर पाहिला मृतदेह

सोमवारी सकाळी त्याची पत्नी पुन्हा फ्लॅटमध्ये परतल आली. तिने स्वत: कडील चावीने फ्लॅटचा दरवाजा उघडला. फ्लॅटमधील एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचं तिला जाणवताच तिने खिडकीतून आत पाहिलं असता आदित्य हा ‘सिलिंग फॅन’ला लटकत असल्याचं दिसून आलं. तिने लगेच खिडकीच्या काच फोडून खोलीत धाव घेत आदित्यला खाली उतरवलं. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

मृतदेह शवचिकित्सासाठी पाठवला

याप्रकरणी वेर्णा पोलिसांना माहिती देण्यात आल्यावर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सासाठी मडगाव जिल्हा हॉस्पिटलात पाठविला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशाला देसाई यांनी दिली.

आदित्य याच्या पश्चात पत्नी आणि दहा वर्षांची मुलगी आहे. आदित्य हा पूर्वी मांगोरहिल येथे राहत होता. त्याने मार्च मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सतरातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!