‘एक जिल्हा एक कृषी उत्पादन’, नारळ आणि फणसाची निवड

आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; उत्तर गोव्यातून फणस, तर दक्षिण गोव्यातून नारळाची निवड

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : केंद्र सरकारच्या पीएम फॉर्मलाइजेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस योजनेतील (पीएमएफएमई) ‘एक जिल्हा एक कृषी उत्पादना’अंतर्गत उत्तर गोव्यातून फणस आणि दक्षिण गोव्यातून नारळ उत्पादनाची निवड करण्यात आली आहे.

स्वयंरोजगाराची निर्मिती करण्याच्या उद्देशाने उपक्रम

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘एक जिल्हा एक कृषी उत्पादना’अंतर्गत ३५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून ७०७ जिल्ह्यांची निवड केली आहे. तसंच येथील उत्पादन प्रक्रियेसाठीही निश्चित केलं आहे. त्यात उत्तर गोव्यातून फणस आणि दक्षिण गोव्यातून नारळ उत्पादनं प्रक्रियेसाठी निवडण्यात आलीत. नाशवंत कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन देणं तसंच स्वयंरोजगाराची निर्मिती करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी पीएम फॉर्मलाइजेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस योजना सुरू केली. योजनेंतर्गत ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ७०७ जिल्ह्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या उत्पादनांवर पुढील काळात प्रक्रियाही सुरू होणार असल्याचं अन्न उद्योग मंत्रालयाने जाहीर केलं आहे.

काय आहे योजना?

  • नाशवंत कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, या उद्देशाने योजनेची निर्मिती
  • पुढील पाच वर्षांसाठी योजनेसाठी एक हजार कोटींची तरतूद. त्यातील ६० टक्के हिस्सा केंद्राचा तर ४० टक्के हिस्सा राज्याचा असेल.
  • जीआय मानांकित नाशवंत कृषिमाल, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाला पिके, मांस प्रक्रिया, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि किरकोळ जंगली उत्पादनांचा समावेशही योजनेतील पिकांत करण्यात आला आहे.

३५ लाख रुपयांचे मिळू शकते अनुदान

शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था तसंच वैयक्तीक बचत गट सदस्याला अन्न प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी त्या युनिटसाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे. राज्यातील दोन्ही जिल्ह्यांचे ‘एक जिल्हा एक कृषी उत्पादन’यादी तयार करून ती मागवण्यात आली होती, तिला आता अंतिम मंजुरी केंद्र सरकारने दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!