कांदोळीत विजेच्या झटक्याने एकाचा मृत्यू

एकजण जखमी; बुधवारी सकाळची घटना

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः कांदोळी येथे वीज तारांचा स्पर्श झाल्याने कालीपोडो रॉय (40) या मूळ दिनाजपूर पश्चिम बंगालच्या कामगाराचा मृत्यू झाला. तर त्याला वाचविण्यासाठी गेलेला राकेश रॉय हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत.

बुधवारी सकाळची घटना

ही घटना बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. कोमोतीवाडो कांदोळी येथे मयत आणि जखमी हे कामगार एका एक मजली घराच्या छतावरीर (टेर्रस) प्लास्टिक पाण्याच्या टाकीवर झाकण घालण्यासाठी चढले होते. टाकीवर झाकण घालत असताना मयत कालीपोडो रॉय हा जवळच असलेल्या सोलर पॅनलकडे गेला. तेथे त्याचा स्पर्श रेंगाळणार्‍या वीज तारांशी झाला. आणि त्याला जोरदार वीजेचा झटका बसला आणि तो छतावरील पाण्याचा निचरा होणार्‍या ठिकाणी पडला.

जखमीवर गोमेकॉत उपचार

हा प्रकार निदर्शनास येताच जखमी राकेश रॉय हा आरडाओरडा करीत मयताच्या मदतीला गेला. त्यामुळे त्यालाही वीजेचा झटका बसला आणि तो पडला. हा प्रकार घर मालकाच्या निदर्शनास येताच त्यांनी 108 रूग्णवाहिका तसंच अग्नीशमन दल आणइ पोलिसांना पाचारण केलं. तोपर्यंत मयताचा मृत्यू झाला होता. रूग्णवाहिकेतील कर्मचार्‍यांनी त्यास मृत घोषित केलं. तर जखमीला उपचारार्थ गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आलं.

पुढील तपास सुरू

अग्नीशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने पोलिसांनी मयताचा मृतदेह खाली काढला आणि पंचनाम्याअंती शवविच्छेदनासाठी तो गोमेकॉमध्ये पाठवून दिला. कळंगुट पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जतीन पोतदार पुढील तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!