सरकार टॅक्सी आंदोलकांना कायदा हातात घेण्यास भाग पाडतंय – जीत आरोलकर

चोपडे जंक्शनवर धरणे आंदोलन; टॅक्सी आंदोलकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पेडणेवासी उतरले रस्त्यावर

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजी : गोवा माईल्स टॅक्सी अ‍ॅप रद्द करण्याची मागणी करीत स्थानिक टॅक्सी मालकांनी पणजीतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या आंदोलनाला आता पेडणेवासीयांनी पाठिंबा दर्शवलाय. रविवारी चोपडे जंक्शनवर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मांद्रे मतदारसंघातील जवळपास 650 टॅक्सी चालक रस्त्यावर उतरलेत. टॅक्सी आंदोलकांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणी यावेळी पेडणेवासियांनी केलीये.

राज्यात येणारे पर्यटक गोवा माईल्स टॅक्सी अ‍ॅप स्वीकारत असल्यानं स्थानिकांना भाडी मिळणं कठीण झालंय. सरकारने ‘गोवा माईल्स’ तत्काळ रद्द करून स्थानिक टॅक्सी मालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी पेडण्यातील आंदोलकांकडून करण्यात आली.

अ‍ॅडव्होकेट प्रसाद शाहपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणेवासीयांनी हे एक दिवसीय धरणे धरलंय. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोवा फॉर्वर्डचे नेते दीपक कळंगुटकर, मगोप नेते जीत आरोलकर, देवेंद्र प्रभुदेसाई,  अमोल राऊत, संजय कोले, प्रकाश पुरके, आगरवाडाचे माजी सरपंच तसंच नागरिकांनी उपस्थिती लावली.

अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवेला गोव्यात भविष्य नाही

अ‍ॅप आणि मिटर आधारित टॅक्सी सेवा फक्त मेट्रोपोलिटीयन शहरांसाठीच चांगली आहे. गोव्यात अशा टॅक्सी सेवेला भविष्य नाही. गोव्यात जर मिटर आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याची आहे, तर त्यासाठी सरकारने टॅक्सी व्यावसायिकांना अगोदर विश्वासात घ्यायला हवं होतं. टॅक्सी व्यवसायिकांशी विचार विनिमय न करता परस्पर सरकारने घेतेलेले निर्णय हे बरोबर नाहीत. काय तरी तडजोड करून, टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रश्नावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी गोवा फॉर्वर्डचे नेते दीपक कळंगुटकरांनी केली.

सरकारने आडमुठेपणा सोडावा

एवढे दिवस टॅक्सी व्यावसायिकांनी आझाद मैदानावर शांतीपूर्ण धरणे आंदोलन सुरू ठेवलंय. पण शनिवारी त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यापासून रोखलं. अगोदरच सरकारने गोवा माईल्स टॅक्सी सेवा आणून त्यांच्यावर अन्याय केलाय. आता सरकार त्यांना शांततेत आंदोलनही करू देत नाहीये. सरकार मुद्दाम टॅक्सी व्यावसायिकांना कायदा हातात घेण्यासाठी भाग पाडतेय. टॅक्सी चालकांचं पोट त्यांच्या व्यवसायावरच चालतं. सरकारने निदान त्यांच्या कुटुंबाचा तरी विचार करावा आणि गोवा माईल्ससारखं टॅक्सी अ‍ॅप स्क्रॅप. त्याचप्रमाणे टॅक्सी व्यावसायिकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे, अशी मागणी मगोप नेते जीत आरोलकरांनी केली.

कधी संपणार टॅक्सी वाद?

डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यापासून गोवा माईल्स आणि स्थानिक टॅक्सी मालकांचा वाद सातत्याने सुरू आहे. याच वादातून गोवा माईल्सच्या चालकांवर हल्ले होण्याच्याही घटना गेल्या काही महिन्यांत घडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत सरकार गोवा माईल्सवर ठाम आहे. पण, त्यावरून एकही विरोधी पक्ष टॅक्सी मालकांच्या आंदोलनांत उतरून सातत्याने रस्त्यावर आलेला दिसला नाही. पण आता टॅक्सी आंदोलकांना विरोधी पक्षांकडून मिळणारा पाठिंब्यामुळे विधानसभा निवडणूकांमुळे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी विरोधक टॅक्सी मालकांच्या आंदोलनात सक्रिय होत असल्याची टीका काही जणांकडून होतेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!