कळंगुटमध्ये पिस्तूल रोखल्याबद्दल एकाला अटक

गुरुवारची घटना; एकाला अटक, तर दुसरा पसार

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: कांदोळी येथे एका इमारतीच्या केअरटेकवर पिस्तूल रोखून आणि त्याच्यावर हल्ला करून पसार होणाऱ्या दोघा संशयितांपैकी एकाला जमावाने बेदम चोप दिला. तर दुसरा पसार झाला. कळंगुट पोलिसांनी सुशील जय भगवान (२७, झाज्जर हरयाणा) यास अटक केली आहे. पोलीस फरारी गौतम वालीया (दिल्ली) याचा शोध घेत आहेत.

हेही वाचाः मुंबई-गोवा महामार्गावर 13 वर्षांत 2500 बळी

गुरुवारी संध्याकाळची घटना

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार गुरुवारी संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास घडला. या प्रकरणी गुरू चव्हाण (वोर्डा कांदोळी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कांदोळी येथील लवंदे सुपरमार्केटच्या मागील गौतम निश्चय रेसिडेन्सी या इमारतीच्या छतावर दोन्ही संशयित आरोपी बसले होते. या इमारतीचा केअरटेकर तथा स्विमिंग पूल अटेंडन्ट असलेल्या फिर्यादीच्या नजरेस ही गोष्ट पडली. त्यांनी संशयितांनी इथे काय करता, असं विचारलं. त्याबरोबर संशयितांपैकी एकाने त्यांच्यावर पिस्तूल रोखलं, तर दुसऱ्याने त्यांच्या डोक्यावर दांडा हाणला. आणि दोघांनीही तेथून धूम ठोकली.

जमावाने पाठलाग करून पकडलं

फिर्यादी चव्हाण यांनी त्यांचा आरडाओरडा करीत पाठलाग केला आणि याचवेळी आपल्या मुलाला फोन करून घडलेली घटना सांगितली. त्याबरोबर त्यांचा मुलगाही आपल्या मित्रांसमवेत घटनास्थळी आला. सुमारे दीड दोन किलोमीटरवर पाठलाग करून जमावाने कामत हॉलीडे होम हॉटेलजवळ एका संशयितास पकडलं आणि त्याला चोप दिला.

हेही वाचाः तेव्हाच मृतदेह प्रत्यक्ष पाहिला असता तर…

संशयिताजवळ सापडली देशी कट्टा पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि बॅग

संशयिताजवळ देशी कट्टा पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि बॅग होती. त्यानंतर जमावाने पोलिसांना पाचारण करून त्याला त्यांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी संशयित आरोपीस पोलीस स्थानकावर आणलं आणि फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे भा.दं. सं.च्या ३२४ व बंदूक कायदा कलम २५ खाली गुन्हा नोंद केला. या गुन्ह्याखाली संशयित आरोपी सुशील जय भगवान यास अटक केली. तर फरारीचा शोध सुरू आहे.

हेही वाचाः न्यायालयीन प्रक्रियेत अडकली ईव्हीएम यंत्रे!

त्या दोघांचा नेमका उद्देश काय होता?

संशयित गोव्यात विशेषतः कळंगुटमध्ये काय करत होते. कोणत्या गुन्हेगारी उद्देशाने आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. संशयितांना कुणाची सुपारी मिळाली होती की, ते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आखणी करीत होते, याचाही शोध घेतला जात आहे.

या घटनेनंतर पुन्हा एकदा गोंयकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हा व्हिडिओ पहाः VIOLENCE AGAINST WOMEN | महिन्याकाठी महिलांवरील अत्याचाराच्या 20 घटना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!