मडगाव फेस्तनिमित्त नगराध्यक्षांनी घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय…

मडगाव फेस्तनिमित्ताने नियोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : मडगावातील फेस्ताच्या फेरीदरम्यान एकाही विक्रेत्याला फुटपाथवर किंवा इतरत्र विनापरवाना व्यवसाय करू देणार नाही. मडगाव पालिकेकडून तीन निरीक्षक, दोन स्वच्छता निरीक्षक, एक कनिष्ठ अभियंता व इतर कर्मचारी अशी पंधरा जणांची टीम तयार करण्यात आलेली असून समन्वय साधून हे फेस्त चांगल्याप्रकारे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.
हेही वाचाःमुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले…

मडगाव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी पत्रकार परिषद घेत फेस्ताच्या नियोजनाबाबत माहिती दिली. फेस्तानिमित्ताने वाहतूक पोलीस वाहतुकीची कोंडी होणार नाही, याकडे लक्ष देतील. पालिका कर्मचाऱ्यांकडूनही फेस्ताच्या ठिकाणी पोलिसांशी समन्वय साधण्यात येणार आहे. फेस्ताच्या फेरीत ९०, १५० व ६० असे एबीसी वर्गवारीत स्टॉल्स तयार करण्यात आलेले आहेत. पहिल्यांदा आलेल्या व्यक्तीला प्रथम संधी देण्यात आलेली असताना काही वर्षानुवर्षे स्टॉल्स घालणाऱ्या व्यक्तींनाही स्टॉल्सचे वाटप करताना प्राधान्य दिलेले आहे, असे शिरोडकर म्हणाले. एसजीपीडीएच्या जागेवरील फेस्ताच्या फेरीत पालिकेकडून कोणताही सहभाग घेण्यात आलेला नाही. उभारण्यात आलेल्या स्टॉल्सकडून बरॅक कर, कचरा कर व सोपो पालिका संकलित करणार आहे. 

तो केवळ योगायोग : शिरोडकर

नगराध्यक्ष पदाचा ताबा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी फातोर्डा आमदारांना कॉल केला असून काही काम असल्यास सांगण्याची विनंती केलेली होती. आपण सर्व नगरसेवकांना बोलावले व आमच्यापेक्षा माडेलमधील लोकच जास्त बोलले आहेत. कार्यालयात गेलो असता जिल्हाधिकारी व आमदार बसलेले असल्याने त्याठिकाणी बसलो हा केवळ योगायोग होता. त्याठिकाणी फेरीबाबत काहीही चर्चा झाली नाही. काही गौडबंगाल करायचे असल्यास मडगावच्या आमदारांना सोबत घेत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेता आली असती. मात्र, सर्वांना विश्वासात घेत नियोजन करुन फेस्ताची फेरी केली जात आहे, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर म्हणाले.

फेरीला मुदतवाढ नाही

मडगावात आयोजित करण्यात येत असलेल्या फेस्ताच्या फेरीला सात दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. या फेस्ताच्या फेरीला आठव्या दिवशी मुदतवाढ देण्यात येणार नाही. पालिकेचे कर्मचारी व गाडी त्याठिकाणी असतील. फेस्तासाठी सात दिवस मुदत असल्याने आठव्या दिवशी दुकान सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकाचे साहित्य जप्त करण्यात येईल, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!