जुने गोवा मारहाण प्रकरणः जोझफ डायसचा उपचारादरम्यान मृत्यू

संशयित गजानन पवार याच्याविरोधात खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: जुने गोवा येथील एका सुपर मार्केटमध्ये क्षुल्लक कारणासाठी मारहाण करण्यात आलेल्या जोझफ डायसचा त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी संशयित गजानन पवार याच्याविरोधात खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केली नसल्यामुळे संशयित पोलिसांच्या हातातून निसटला.

प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जोझफ डायस पत्नीसह ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी जुने गोवे येथील एका सुपर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी गेला होता. या वेळी खरेदी झाल्यानंतर जोझफ बिल भरण्यासाठी एका काउंटरच्या रांगेत थांबला होता. तर त्याची पत्नी बंद असलेल्या काउंटरकडे जाऊन थांबली. त्याच वेळी गर्दी झाल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या ठिकाणी बिल घेण्यासाठी काउंटर सुरू केलं. यावेळी डायस यांच्या पत्नीसह इतर महिला त्या ठिकाणी जमा झाल्या. याच वेळी संशयित गजानन पवार त्या काउंटरकडे आला आणि सर्वांच्या पुढे जाऊन उभा राहिला. त्यावेळी डायस यांच्या पत्नीसह इतरांनी त्याला विरोध केला.

त्यानंतर डायस दांपत्य घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ गेले. याचवेळी संशयित गजानन पवार त्यांच्याजवळ येऊन वाद घालू लागला. तसंच त्याने जोझफ डायस यांच्या डोक्यावर मुक्का मारून त्यांना खाली पाडले. यावेळी पोलिसांना पाचारण करून संशयित गजानन पवार याला नागरिकांनी त्यांच्या स्वाधीन केले. तसेच डायस यांच्या डोक्यावर जखम झाल्यामुळे त्यांना पोलिसांनी इस्पितळात तत्काळ दाखल केले. त्यानंतर जुने गोवे पोलिसांनी संशयित पवार याच्याविरोधात मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.

संशयिताची जामिनावर सुटका

अटक करण्यात आलेल्या संशयिताची नंतर पोलिसांनी जामिनावर सुटका केली. त्यानंतर उपचार सुरू असताना २० रोजी डायस याचा मृत्यू झाला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तसंच प्रथम भरपूर वेळ संशयिताविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली होती. असं असताना पोलिसांनी वेळीच कारवाई केली नसल्यामुळे संशयिताला पळ काढण्यास वेळ मिळाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद

दरम्यान याप्रकरणी कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलिसाकडे संपर्क साधून कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी संशयित गजानन पवार याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून एक पथक संशयिताच्या मूळ गावी कोलकाता येथे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!