दक्षिण गोव्यात एनएसए लागू; सरकार म्हणते नियमीत प्रक्रिया

लोकांचा आवाज दडपण्यासाठी कायदा लागू केला; विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांचा आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात दक्षिण गोव्यात पुढील तीन महिन्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यासंबंधीचा आदेश गृह खात्याचे अवर सचिव प्रतिदास गांवकर यांनी जारी केलाय. या कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही या आदेशात म्हटलंय. गोवा क्रांतीदिनी लोकांचा आवाज दडपण्यासाठीच हा कायदा लागू केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केलाय. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र याबाबत स्पष्टीकरण देत हा नियमीतपणे काढला जाणारा आदेश आहे आणि त्यात नवीन काहीच नाही,असं म्हणून कामत यांचा फेटाळून लावलाय.

जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न

सरकारकडून राज्यात दक्षिण गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू केल्यानंतर विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत पेटून उठलेत. त्यांनी सरळ सरळ सरकारवर आरोप करताना ट्विट केलंय. ट्विट करताना कामत म्हणालेत, काँग्रेस पक्षाने आज गोवा क्रांती दिनी बेजबाबदार भाजप सरकारच्या विरूद्ध मुक्तीचा नारा दिल्यानंतर, घाबरलेल्या डॉ. प्रमोद सांवत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दक्षिण गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याचा आदेश जारी केला. जनतेचा आवाज दडपण्यासाठी आणि गोमंतकीयांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी जाहीर केलेल्या सरकारी निर्णयाचा मी तिव्र निषेध करतो.

हा नियमीतपणे काढला जाणारा आदेश

दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय. स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणालेत, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत सक्षम प्राधिकरण घोषित करण्याचा आदेश दर 3 महिन्यांनी दिला जातो. हा एक नियमित आदेश आहे जो जिल्हा दंडाधिकाऱ्यांना एनएसए कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या कोणत्याही प्रस्तावांची विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करतो. हे नेहमीचंच आहे आणि त्यात नवीन असं काही नाही. हे अधिकार राज्य सरकार जिल्हा दंडाधिकारी किंवा पोलिस प्रमुखांना सोपवते, असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी कामतांचा आरोप फेटाळून लावलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!