आता जेटीचं पणजीत स्थलांतर

बंदल कप्तान खात्याची माहिती; तरंगत्या जेटीला कामुर्लीतही विरोध

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः शिवोली आणि आगरवाडा चोपडेतील लोकांनी शापोरा नदीतील तरंगत्या जेटीला ठाम विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर कामुर्लीला जेटी हलविण्यात आली. तेथेही स्थानिकांनी विरोध दर्शविला. आमदार निळकंठ हळर्णकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना बंदर कप्तान खात्याने जेटी पणजीला हलविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचाः तरंगत्या जेटीवरून मच्छिमार बांधवांची सेवा की राजकीय स्वार्थ?

शुक्रवारी तरंगत्या जेटीचं कामुर्लीत स्थलांतर

नदी किनारी शिवोली आणि चोपडेतील लोकांच्या विरोधामुळे बंदर कप्ताना मंत्री मायकल लोबो यांनी लोकांना नको असल्यास शापोरा नदीतील जेटी इतरत्र हलविण्याचं आश्वासन दिलं होतं.  शुक्रवारी सदर तरंगती जेटी कामुर्ली फेरी धक्क्याजवळ आणून ठेवण्यात आली. यासाठी बंदर कप्तान खात्याने स्थानिक पंचायतीला विश्वासात घेतलं होतं. मात्र या जेटीला स्थानिकांनी विरोध दर्शविला आणि लोकांनी पंचायत मंडळ तसंच आमदार हळर्णकर यांना पाचारण केलं.

हेही वाचाः स्थानिकांचा विरोध असल्यास तरंगत्या जेटीचं स्थलांतरण

कंत्राटदाराला धरलं धारेवर

आमदारांसह उपस्थित लोकांनी कंत्राटदाराला धारेवर धरलं आणि जेटीला विरोध दर्शविला. पंचायत मंडळासह आम्हाला यासंबंधी विश्वासात घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे ही जेटी इथून ताबोडतोब हटवावी अशी मागणी लोकांनी केली. ही जेटी चोपडेच्या बाजूने उभारण्यात येणार होती. पण विरोधामुळे ती स्तलांतरीत करण्यात येत आहे. वादळी समुद्रामुळे जेटी हलवता येत नसल्याने येथे आणून ठेवण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींनी लोकांना दिलं.

हेही वाचाः शापोरा नदीतील ‘त्या’ जेटीला आगरवाडा – चोपडेवासियांचाही विरोध

नदी देवस्थानची नसून पंचायतीची

या जेटीबद्दल पंचायत मंडळाला कोणताही कल्पना देण्यात आलेली नाही. एका मंदिर समितीने जेटीला नाहरकत दाखला दिला आहे. पण नदी देवस्थानच्या मालकीची नसून पंचायतीशी संबंधित आहे. आम्ही मासिक बैठकीत या तरंगत्या जेटीला विरोध केला असून हा ठराव बंदर कप्तान खात्याला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, असं सरपंच विशांत नाईक गांवकर यांनी सांगितलं.

हेही वाचाः शिवोलीतील तरंगत्या जेटीचे चोपडेत स्थलांतर करणार

जेटीचं लवकरच पणजीत स्थलांतर

या तरंगत्या जेटीला शिवोली तसंच चोपडेतून विरोध झाला. त्यानंतर आमदार आणि पंचायतीला विश्वासात न घेता अचानक ही कामुर्लींमध्ये आणण्यात आली. यामुळे लोक चिंताग्रस्त बनले. याबाबतीत मी बंदर कप्तान खात्याशी बोललो आहे. जेटीचं तात्पुरते स्थलांतर केलेलं असून ही पणजीला नेण्यात येत आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव येथे आणून ठेवण्यात आली असून त्यांनी यासंबंधी पंचायतीकडे पत्रव्यवहार करण्याचं मान्य केलं आहे, असं आमदार निळकंठ हळर्णकर म्हणाले.     

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!