राज्य आरोग्य विभागाकडून कोविड-19 नियमावलीत बदल

कोरोना चाचणीनंतर लगेच कोविड प्रतिबंधक औषधोपचार सुरू करणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढतोय. लॉकडाऊनची आवश्यकता असूनही राज्य सरकार मात्र ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय,’ यावर ठाम आहे. मात्र कोरोनाला जर आळा घालायचा असेल, तर तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेला परिस्थितीचं गांभीर्य माहीत असल्याने त्यांच्याकडून होता होईल ते सर्व प्रयत्न केले जातायत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आरोग्य विभागाकडून एक मोठी घोषणा करण्यात आलीये. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी कोविड-19च्या नियमावलीत महत्त्वाचे बदल करत असल्याचं सांगितलंय.

हेही वाचाः राज्याला ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी मिळाला होता निधी

कोविड अहवालाची प्रतिक्षा न पाहता रुग्णावर औषधोपचार करणार

कोविड-१९ च्या नियमावलीत राज्य आरोग्य विभागाने महत्त्वाचा बदल केलाय. आता कोविड चाचणीसाठी येणाऱ्या व्यक्तीच्या अहवालाची वाट न पाहता त्याच्यावर औषधोपचार सुरू करणार असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलं. राज्यातील आरोग्य विभागाने मंगळवारी एका विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ही महत्त्वाची घोषणा करण्यात आलीये.

हेही वाचाः शिक्षक, प्राध्यापकांना घरातून ऑनलाईन काम करण्याची सूट

योग्यवेळी उपचार न मिळाल्याने मृतांच्या संख्येत वाढ

कोविडला बळी पडणाऱ्यांच्या आकडेवारीवरून असं दिसून येतंय, की बऱ्याच जणांच्या बाबतीत रुग्णालयात दाखल होण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या कोविड नियमावलीत महत्त्वाचे बदल केलेत. आता कोविड-19 ची लक्षणं घेऊन चाचणीसाठी येणाऱ्या रुग्णाच्या अहवालाची वाट न पाहता त्याच्या औषधोपचाराला सुरुवात करण्यात येणारेय. तसंच कोविड चाचणीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रांच्या कमतरतेमुळे राज्यात बऱ्याच नमुन्यांच्या चाचण्या होऊ शकल्या नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी मान्य केलं. मात्र आवश्यक सुविधा वाढवल्यानंतर आता चाचण्या पूर्ण झाल्या असल्याची कबूली आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

हेही वाचाः CORONA UPDATE | बापरे! गेल्या २४ तासांत तब्बल ३८ जणांचा मृत्यू

तज्ज्ञांच्या सल्ल्याने कोविड नियमावलीत अत्यावश्यक बदल

तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोविड-19 नियमावलीत अत्यावश्यक बदल करण्यात आलेत. याच नियमावलीचं पालन इतर राज्यांतही केलं जातंय. राज्य आरोग्य विभाग प्रवाशांना कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट देणार नाही. प्रवाशांनी शासकीय पायाभूत सुविधांवर जास्त ओझं न घालता, कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेटसाठी त्यांनी खासगी रुग्णालयात जावं, असं गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ. शिवानंद बांदेकरांनी सांगितलं.

हेही वाचाः COVID HEALPLINE | गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसची 24×7 कोविड हेल्पलाईन

दरम्यान लवकर उपचार मिळाल्यास गंभीर स्थितीत रूग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांची संख्या कमी होईल, अशी आशा आरोग्य सेवा संचालक डॉ. जोस डीसा यांनी व्यक्त केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!