पर्यटक नव्हे; गोव्यात ‘यांचा’ बोलबाला…

पर्यटकांअभावी किनारे ओस. गुन्हेगारी कारवायांबद्द्दल उत्तर गोव्यात दोघांना अटक.

लौकिक शिलकर | प्रतिनिधी

पणजी : कोविड-19च्या प्रादूर्भावामुळे गोव्याचा पर्यटन व्यवसाय आर्थिक गर्तेत सापडला आहे. पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी राज्य सरकारने राज्याच्या सीमा पर्यटकांसाठी खुल्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, पर्यटक राहिले दूरच; राज्यात ड्रग्ज पेडलर्सचा सुळसुळाट झाला आहे.

पर्यटकांअभावी किनारे ओस पडले आहेत. तरी ड्रग्स व्यावसायिकांनी ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी किनारी भागावर लक्ष केंद्रीत केला आहे. गेल्या काही दिवसांत उत्तर गोव्यात दोघांना अटक करून त्यांच्याकडून ड्रग्स ताब्यात घेण्यात आले. चार दिवसाच्या अंतरात पोलिसांनी 2 किलो वजनाचे ड्रग्स दोघांकडून ताब्यात घेतले. त्याची किमत 2 लाख रुपये आहे.

ड्रग्स आणि पर्यटन असे समिकरण गोव्यात झाले आहे. पर्यटनाशी निगडीत सर्व व्यवसाय ठप्प आहेत. किनाऱ्यांच्या आकर्षणामुळे येणारे पर्यटक अद्याप आलेले नाही. किनाऱ्यावर आकर्षण ठरणाऱ्या शॅक्सची उभारणी करण्यासाठी हालचाली नाहीत. असे असूनही ड्रग्स व्यावसायिकांनी ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

शिवोली येथे इसम ताब्यात
हणजुण पोलिसांनी शिवोली येथे चरस बाळगल्याप्रकरणी शोएब अन्सारी या उत्तर प्रदेश येथील इसमाला रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्याकडून 75 हजार रुपये किमतीचा 75 ग्रॅम चरस ताब्यात घेण्यात आला. तो ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती उपलब्ध होताच सापळा रचला होता. निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

कळंगुट येथे 1 किलो 200 ग्रॅम गांजा ताब्यात
कळंगुट पोलिसांनी मूळ राजस्थानातील एका व्यक्तीकडून सव्वालाख रुपये किमतीचा गांजा ताब्यात घेतला. निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ओमप्रकाश ताड याच्याकडून 1 किलो 200 ग्रॅम गांजा ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. चार दिवसात 2 किलो तसेच 2 लाख रुपये किमतीचा ड्रग्स पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!