कोविडबळी कुटुंबियांना फक्त अर्थसहाय्य नाही, मानसिक आधारही देणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचं प्रतिपादन; कोविडबळी कुटुंबियांना आर्थिक मदत वितरित

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबिना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासह सरकार भावनिक आधार देण्याचाही प्रयत्न करत आहे. त्या त्या भागातील नगरसेवक त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची आर्थिक तसंच मानसिक स्थितीही जाणून घेत आहेत. सरकारने नगरसेवकांकडे कोविडबळीच्या कुटुंबियांचा अहवाल मागितला आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली

कोविडबळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी मान्यतापत्रांचे बुधवारी एका कार्यक्रमात वितरण करण्यात आले. यावेळी पारंपरिक व्यावसायिकांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदतही वितरित करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर समाजकल्याण मंत्री मिलिंद नाईक आणि खात्याचे अधिकारीही उपस्थित होते.

कोविडबळीच्या कुुटुंबियांना दोन लाखांची मदत देणारे गोवा हे पहिलं राज्य

कोविडबळीच्या कुुटुंबियांना दोन लाखांची मदत देणारे गोवा हे पहिलं राज्य ठरलं आहे. या कुटुंबियांना मानसिक आधार देण्याचीही गरज आहे. समाज कल्याण खात्याच्या सचिवांनी नगरसेवकांसमवेत बैठक घेतली आहे. प्रत्येक नगरसेवकाकडे 20 घरांना भेटी देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संपूर्ण स्थिती समजून घेऊन ते अहवाल सादर करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पारंपरिक व्यावसायिकांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देणारं गोवा हे एकमेव राज्य

खाजे विक्रेते, फुलांचे विक्रेते अशा पारंपरिक व्यावसायिकांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देणारं गोवा हे एकमेव राज्य आहे. कोविड काळात सरकारचा महसूल घटला. तरीदेखील सरकारने सामाजिक योजना सुरूच ठेवल्या. महाविद्यालयांच्या शुल्कातही सरकारने सूट दिली. मूलभूत सुविधा उभारण्याची कामेही सुरूच आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यांनीही समयोचित विचार मांडले. कोविडबळीच्या कुटुंबियांसाठीच्या योजनेसाठी ४५०, तर पारंपरिक व्यावसायिकांच्या योजनेसाठी २,६०० अर्ज आले होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!