टीकेला भीत नाही, सरकार 100 टक्के कार्यरत

मुख्यमंत्र्यांचा 2 हजार लोकप्रतिनिधींशी संवाद

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः कोरोनाच्या परिस्थितीवरून सीएमवर टीका करणं खूप सोपं असतं. असले सीएम बघीतलेच नाहीत वगैरे म्हणणेही सोपं पण अशा पद्धतीची कोविड महामारी ही देखील यापूर्वी कुणीच पाहीली नव्हती हे देखील सगळ्यांनी ध्यानात घ्यायला हवं. आपण टीकेला अजिबात भीत नाही. आपलं सरकार शंभर टक्के कोविड आटोक्यात आणण्यासाठी कार्यरत आहे. टीका कराच पण प्रत्येकानं कोविड रोखण्यास सरकारला सहकार्य केलं तर निश्चितच कोविड पॉझिटीव्हीटी रेट आणि मृत्यूदर कमी करता येईल, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

हेही वाचाः अखेर मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला

2 हजार लोकप्रतिनिधींशी संवाद

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने सुमारे 2 हजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींकडे संवाद साधला. यात पंचायत, जिल्हा पंचायत, नगरपालिकांचा समावेश होता. पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो हेदेखील हजर होते. कोविडची परिस्थिती चिंताजनक आहे. ही महामारी पहिल्यांच आल्याने त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे झटते आहे. बाहेरून सरकारला सल्ले देणं आणि सरकारवर टीका करणं खूप सोपं असतं. सरकार शंभर टक्के आपले काम करतंय. पुढील 10 दिवसांत आपल्याला परिस्थिती कोणत्याही तऱ्हेने आटोक्यात आणायचीए. यासाठी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याची गरज आहे, असं आवाहन त्यांनी केलं.

हेही वाचाः 2 हजार लोकप्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

लोकप्रतिनिधींना फ्रंटलाईनचा दर्जा मिळणार

सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींना कोविड फ्रंटलाईनचा दर्जा मिळणार आहे. यासंबंधीचा आदेश लवकरच जारी केला जाईल. ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. इथे फक्त लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे. चाचणी झाल्यानंतर रिपोर्ट घरपोच मिळेल याची सोय करा तसंच लक्षणं असल्यास त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असो वा नसो पण औषधे सुरू करा, असं मुख्यमंत्री म्हणालेत. कोरोना किट लोकांना घरपोच पोहचवण्यासाठी मदत करा, अशी विनंतीही त्यांनी केली. आपल्या प्रभागात कुणी आजारी असेल किंवा त्याला इस्पितळ उपचारांची गरज असेल तर अजिबात वेळ दवडू नाका. काहीतरी सोय करा आणि त्यांना इस्पितळात दाखल करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.

हेही वाचाः आता 18 वर्षांवरील कोरोना रूग्णांवर ‘प्रॉफिलेक्सिस ट्रीटमेंट’

लसीकरण यशस्वी करा

कोरोनातून मुक्ती मिळण्याचं एकमेव साधन हे लसीकरण आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदा स्वतःहून लसीकरण करून घ्यावं तसंच आपल्या प्रभागातील पात्र लोकांचं शंभर टक्के लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्यात 74 लसीकरण केंद्रे सुरू केली जातील. सकाळी 9 ते संध्या. 6.30 पर्यंत लसीकरण केले जाईल. 45 वर्षांवरील प्रत्येकाचं लसीकरण झालंच पाहिजे, असंही त्यांनी निक्षून सांगितलं. होम आयसोलेशनमधील रूग्ण घराबाहेर फिरता कामा नये. अशा रूग्णांकडे बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींची. या रूग्णांची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचाः आता राज्यात फिरती लसीकरण मोहिम

खाटांची चिंता नको

प्रत्येक गरजूवंत रूग्णाला खाटांची सोय केली जाईल. विनाकारण खाटा नाही, अशा भ्रमात राहू नका. 02494545 या नंबरवर संपर्क केल्यास हॉस्पिटलमधील खाटांची माहिती मिळू शकेल. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाचा जीव वाचवण्याचं आपलं सगळ्याचं कर्तव्य आहे. सरकार सर्व मदत आणि सहकार्य करणार आहे. या एकूणच लढाईत स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमीका अत्यंत महत्त्वाची, मौल्यवान आहे, असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Video | CM VC MEETING | BREAKING | २ हजार लोकप्रतिनिधींना थेट निर्देश, कामाला लागा!

बस्तोड्याचं प्रकरण गंभीर

एका मृत कोविड रूग्णाच्या अंत्यविधीला विरोध करण्याचा बस्तोड्यातील प्रकार खूपच गंभीर आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. वास्तविक हे विषय स्थानिक पातळीवर सोडवण्याची गरज आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या पातळीवर या विषयांवर तोडगा काढण्याची गरज आहे. या कोविड संकट काळात धार्मिक आणि राजकीय विषयांचा बाऊ करू नाका. माणूसकीचं दर्शन घडविण्याची ही वेळ आहे. असल्या प्रकारांना अजिबात थारा दिला जाणार नाही, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!