कोसळलेल्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नेमका कशामुळे कोसळला डोंगराचा भाग?

देविदास गावकर | प्रतिनिधी

सत्तरी : सत्तरी तालुक्याच्या इतिहासामध्ये यंदा प्रथमच झरमे, करंझोळ, साटरे आणि करमळी बुद्रुक या भागातील डोंगर कोसळण्याचे प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या कोसळलेल्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासकीय यंत्रणाच्या साहाय्यानं साट्रे इथं भेट देत नुकसानीची पाहणी केली आहे. रविवारी सकाळी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या भागाचा आढावा घेतलाय.

यावेळी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी, मामलेदार, कृषी अधिकारी आणि जलसंधारण खात्याचे अधिकारी, पंचायतीचे तलाठी आणि इतर कर्मचारी वर्गही उपस्थित होता. सत्तरीतील काही भागात डोंगर कोसळ्याच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जैविक संपत्तीची हानी झाली आहे. तसंच डोंगराचा भाग कोसळल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत.

हेही वाचा – BLAST | हेडफोन्सचा स्फोट होऊन तरुणाचा मृत्यू

गेल्या अनेक वर्षांपासून डोंगराळ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी झाडांची कत्तल वन खात्यातर्फे व्यवस्थित प्रमाणात रान व्यवस्थापन हाती घेण्यात न आल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत यासाठी आतापासूनच उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. सध्यातरी ज्या ठिकाणी डोंगर कोसळला आहे तिथे मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ती आणि काजू बागायतीची हानी झालेली आहे. सत्तरी तालुक्यातील एकूण चार ठिकाणी डोंगर कोसळण्याचा प्रकार घडला आहे. यापूर्वी अशा प्रकारचा प्रकार घडला नव्हता. त्यामुळे आत्ताच घडलेल्या या प्रकारामुळे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेत.

दरम्यान, रविवारी जी पाहणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली, त्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. साट्रे आणि करमळी बुद्रूकनंतर झरमे, करंझोळ, कुमठोळ या ठिकाणीही पाहणी केल्यानंतर अधिकारी प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महाडला झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती सत्तरीतील गावात होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. सुदैवानं ज्या भागात डोंगर कोसळण्याच्या घटना घडल्या, तिथं मानवी वस्ती नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय.

हेही वाचा – मुख्यमंत्र्याचं चुकलं, पण म्हणून तुम्ही बरोबर कसे ?

सत्तरीतील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भागातील झाडांची कत्तल होऊ लागली आहे. यामुळे जमिनीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे डोंगराळ भागात पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती खाली येऊन हा प्रकार घडू लागला आहे. सत्तरी तालुक्याच्या अनेक डोंगरावर आजही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यानंतर जमिनीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता कमकुवत झाली. यामुळे हा प्रकार घडल्याचा प्रथमदर्शी अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – गोव्यात ‘घाटी’ हा शब्द शिवी असल्यासारखा वापरला जातो, त्यानिमित्त…

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!