वाळपई बाजारात कोविड नियमावलीचे तीनतेरा

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; काळजी करायला लावणारं चित्र

देविदास गावकर | प्रतिनिधी

वाळपईः राज्य सरकारने कर्फ्यू नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे जवळ जवळ दिड महिन्यांनंतर राज्यातील व्यवहार हळुहळू सुरळीत होत आहेत. राज्यात जरी कोविड रुग्णांचं प्रमाण कमी होत असलं, तरी ते शून्यावर आलेलं नाही. गोवा सरकारने कोविडवर नियंत्रण राखण्यासाठी संचारबंदी लागू केलीये आहे. सदर संचारबंदी आता 28 जूनपर्यंत वाढवण्यात आलीये आहे. मात्र वाळपईत मंगळवारी कोविडचे नियम लोकांनी पायदळी तुडवत गर्दी केली.

काळजी करायला लावणारं चित्र

वारंवार सरकारतर्फे नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात येतंय. त्याचप्रमाणे नगरपालिका पंचायत प्रशासन यांनी सहकार्य करावं अशी विनंती केली जातेय. मात्र एवढं सगळं असूनही मंगळवारी वाळपई बाजारात दिसलेलं चित्र हे काळजी करायला लावणारं आहे. सोशल डिस्टन्सिंग तसंच इतर नियम न पाळता वाळपईत लोक बाजारहाट करताना दिसले. अशा प्रकारांवर आता कारवाई तरी कोणी करावी, असा सवाल यानंतर उपस्थित होतोय.

सरकारी यंत्रणेला वाकुल्या

पंचायत आणि सरकारी यंत्रणेने अशा प्रकारांवर नियंत्रण राखणं गरजेचं आहे. किंबहुना लोकांनी जबाबदारीने वागणं आवश्यक आहे. मात्र वाळपई बाजारात यातलं काहीच होताना दिसलं नाही. कोरोनाची भीती बाजून सारून नागरिकांनी बाजाराला मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंग न पाळता बागायतदार बाजाराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लोकांनी रांगा लावल्या. सरकारी यंत्रणेला वाकुल्या दाखवीत अशा प्रकारे गर्दी करणं हे कितपत योग्य आहे, हा सवाल हे चित्र पाहून उपस्थित होतोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!