मासळी खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

मडगावातील प्रकार; पोलिसांकडून कोविड नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई आवश्यक

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: पालिका निवडणुकांच्या प्रचारानंतर वाढलेली मडगाव आणि फातोर्डामधील करोनाबाधितांची संख्या आता कमी होत आहे. सक्रिय रुग्णसंख्या कमी होत असल्यानं नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झाली असून रविवारी मासळी खरेदीसाठी नागरिकांनी सामाजिक अंतराचं भान न राखता गर्दी केल्याचं दिसून आले. कर्फ्यूतून सकाळच्या वेळी सूट दिलेली असली तरी पोलिसांनी अशा प्रकारांकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

हेही वाचाः आता मास्क घालून बोलणं झालं सोप्पं

मडगावात कोविड मृत्यू कायम

मडगाव व फातोर्डा परिसरात पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचाराचा परिणाम म्हणून कोविडबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. काही नगरसेवकांनाही करोना संसर्ग झाल्यानं तेही उपचार घेत असल्यानं त्यांनाही या संकटकाळात घरीच राहावं लागलं. नगरसेवक पॉझिटिव्ह असल्यानं नगराध्यक्ष पदाची निवडणूकही लांबणीवर टाकण्याची वेळ प्रशासनावर आली. मडगाव आणि फातोर्डा परिसरातील एक ना दोघांचा अजूनही रोज मृत्यू होत आहे. कोविडबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी मृत्यूचा आकडा कमी होत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मडगाव आणि फातोर्डा परिसरात नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे.

हेही वाचाः करोनावर आयुर्वेद उपचारपद्धती फायदेशीर

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सध्या गांधी मार्केट, न्यू मार्केट बंद ठेवण्यात आलेलं असलं तरी रस्त्यावर अवैधरीत्या वस्तूंची विक्री अजूनही सुरूच आहे. त्यासाठी नागरिक गर्दी करताना सामाजिक अंतराच्या नियमाची पायमल्ली करत आहेत. फातोर्डा पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्याकडून फातोर्डा परिसरात कारवाई सुरू आहे. मासळी मार्केटनजीक बॅरिकेटस टाकून नागरिकांना गर्दी करण्यास मज्जाव केला जात आहे. मात्र, मडगाव पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रात सगळंच आलबेल सुरू आहे. गाड्यांमधून गस्तीसाठी पोलीस फेऱ्या मारतात परंतु, रस्त्याशेजारी जमून गप्पा मारणाऱ्यांनाही विचारणा करत नाहीत. मडगावात पालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर फिरत्या विक्रेत्यांनी रावणफोंड परिसरात रस्त्याशेजारी दुकाने मांडली आहेत. रावणफोंड सर्कलनजीक पोलीस हेल्मेट नसलेल्यांवर कारवाई करत असतानाही या विक्रेत्यांकडे व होणाऱ्या गर्दीकडे डोळेझाकपणा करत आहेत.

हेही वाचाः राज्यव्यापी कर्फ्यू 31 मे पर्यंत वाढवला

अन्यथा मडगावातील कोविड रुग्णसंख्या अजून वाढणार

राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आलेला असून सकाळच्या सुमारास जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना मुभा देण्यात आलेली आहे. राज्यातील मार्केट बंद ठेवण्यात आलेली आहेत. असं असताना पोलिसांवरील जबाबदारी वाढली असून नागरिक गर्दी करणार नाहीत, याची काळजी दुकानदारांसोबत पोलिसांनी गस्त घालताना ठेवणं आवश्यक आहे. दुपारनंतरही मडगाव परिसरात अनेकजण विनाकारण फिरताना दिसूनही पोलीस कारवाई झालेली दिसत नाही. रविवारी पॉवर हाऊसनजीक मासळी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अशा प्रकारांवर मडगाव, मायना कुडतरी व फातोर्डा पोलिसांनी आळा घालण्यासाठी कारवाईचा बडगा उचलणं गरजेचं आहे. अन्यथा मडगाव व फातोर्डा परिसरातील कमी झालेली सक्रिय रुग्णसंख्या आणखी वाढणार यात शंका नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!