ईएसआयमध्ये प्राणवायूचा तुटवडा

४८ सिलिंडर्सची एकमेव ट्रॉली ईएसआयमधून काढून घेऊन दक्षिण गोवा इस्पितळाला दिल्यामुळे ईएसआयमध्ये गंभीर परिस्थिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः येथील ईएसआय इस्पितळापेक्षा राज्य सरकारने दक्षिण गोवा मुख्य इस्पितळावर कोविड मुकाबल्यासाठी लक्ष केंद्रित केल्यानं ईएसआयमध्ये प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी अचानक प्राणवायूची ४८ सिलिंडर्सची एकमेव ट्रॉली ईएसआयमधून काढून घेऊन दक्षिण गोवा इस्पितळाला दिल्यामुळे ईएसआयमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. यासंदर्भात ईएसआयच्या प्रमुख अधिकाऱ्यालाही कल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली.

ट्रॉलीवरील सिलिंडरमुळे रुग्णांना प्राणवायू देणं सुलभ

४८ सिलिंडर्सची ट्रॉली संलग्न ठेवली जाते तेव्हा रुग्णांना त्यांना ठेवलेल्या खाटीपर्यंत पाईपमधून प्राणवायू देणं शक्य होतं. ट्रॉली नसेल तर सिलिंडर वाहक आणून त्यांच्या बेडपर्यंत ठेवावे लागतात. ट्रॉली काढून घेतल्यानंतर काही सुटे सिलिंडर ईएसआयमध्ये शुक्रवारी सकाळी पाठवून देण्यात आले होते. आणखी ४० सिलिंडर पाठवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु ट्रॉलीवरील सिलिंडरमुळे रुग्णांना प्राणवायू देणं सुलभ होतं.

हेही वाचाः कोरोना बाधित डॉक्टरांसाठी स्वतंत्र निवासाची सोय करावी

ईएसआयला प्राणवायूच्या दोन ट्रॉलीची आवश्यकता

सध्या ईएसआयमध्ये १५० रुग्णांना ठेवणं शक्य होत असलं, तरी ही संख्या २०० पर्यंत वाढवणं शक्य आहे. परंतु त्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस व तंत्रज्ञ यांची आवश्यकता आहे. सध्या एक एक तंत्रज्ञ ईएसआयला देण्यात आलेला नसल्यानं रुग्णांचं आरोग्य तपासणाऱ्या यंत्रणा सुरूच होऊ शकलेल्या नाहीत. ईएसआयला प्राणवायूच्या दोन ट्रॉलीची आवश्यकता आहे.

हेही वाचाः SPECIAL | करोनाला नेस्तनाबूत करणं हे एकच ध्येय : मुख्यमंत्री

ईएसआयला सापत्न भावाची वर्तणूक

सध्या ईएसआयमध्ये १४३ रुग्ण असून त्यातील ५६ जणांना प्राणवायूची आवश्यकता आहे. ईएसआय प्रशासकांनी तेथील परिस्थिती यापूर्वीच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना कळवली आहे. परंतु त्यांनीही दक्षिण गोवा इस्पितळावर लक्ष केंद्रित केल्यानं ईएसआयला सापत्न भावाची वर्तणूक मिळू लागली आहे. यापूर्वीच अत्यंत कमी वैद्यकीय कर्मचारी दिमतीला असल्यानं ईएसआयचा कारभार हेलकावे खात चालू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!